सिमेंट रस्त्यातून सिमेंट गायब

राजेश प्रायकर
Friday, 6 November 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातील वस्त्यांमध्ये आमदार निधीतून सिमेंट रस्ते मंजूर करण्यात आले होते. याअंतर्गत रामेश्वरी येथील एका वस्तीत वानखेडे आटा चक्की यांच्या घरासमोरील जुना रस्ता खोदून सिमेंट रस्ता फेब्रुवारी-मार्चमध्ये तयार करण्यात आला.

नागपूर : शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत वस्त्यांमध्येही सिमेंटचे जाळे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे पुढे येत आहे. रामेश्वरी येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून झालेल्या एका रस्त्याच्या बांधकामात सिमेंटचा वापर झाला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी बांधकामानंतर महिनाभरातच गिट्टी बाहेर आली असून त्यावरून वाहने घसरून पडत असून हा सिमेंटचा रस्ता नागरिकांच्या डोक्याला ताप झाला आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातील वस्त्यांमध्ये आमदार निधीतून सिमेंट रस्ते मंजूर करण्यात आले होते. याअंतर्गत रामेश्वरी येथील एका वस्तीत वानखेडे आटा चक्की यांच्या घरासमोरील जुना रस्ता खोदून सिमेंट रस्ता फेब्रुवारी-मार्चमध्ये तयार करण्यात आला. मात्र महिनाभरातच या रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी बाहेर आली.

अजूनही हा रस्ता गिट्टीचाच असून नागरिकांना दुचाकी चालविताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिनाभरातच सिमेंट उडाल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर तेही आश्चर्यचकित झाले.

जीर्ण सिवेज लाईनचा फटका, तीनशेवर विहिरी दूषित

मुख्यमंत्री निधीतील पैशातून निकृष्ट सिमेंट रस्ता तयार झाल्याने अधिकाऱ्यांचीही घाबरगुंडी उडाली. तत्काळ या रस्त्यांच्या कंत्राटदाराला बोलावून झापले. परंतु गेल्या नऊ महिन्यांपासून हा निकृष्ट रस्ता कायम असून परिसरातील नागरिकांना वाहने चालविताना सर्कस करावी लागत आहे. एवढेच नव्हे या परिसरातील लहान मुलेही रस्त्यावर खेळत असल्याने त्यांच्या पायाला दुखापत होत आहे. मात्र, अद्यापही हा रस्ता पुन्हा तयार करण्यात आला नाही.

कंत्राटदाराला अभय, कारवाई टळली
या रस्त्याचे काम ७० ते ८० लाखांचे होते. कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु पुढे काहीच झाले नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. फडणवीस यांच्या मतदार संघात निकृष्ट दर्जाचे काम होऊनही कंत्राटदारावर कारवाई टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कंत्राटदार या रस्त्याचे काम पुन्हा करणार असल्याचे सूत्राने नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cement disappears from the cement road