चंद्रकांत पाटील म्हणाले, तुम्हाला तुरुंगात जायचे आहे? नाही ना; मग महाआघाडीविरोधात बोलू नका

राजेश चरपे
Thursday, 5 November 2020

कांजूरमार्ग येथील मिठागाराची जागा केंद्राचीच आहे. एवढेच नव्हे तर या जागेवर माजी आमदार बाफना यांच्या पुत्राने दावा ठोकला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मुंबईतील मेट्रो कारडेशचे काम प्रलंबित राहणार असून, खर्चातही मोठी वाढ होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला.

नागपूर : महाराष्ट्रात दंडुकेशाही सुरू आहे. महाआघाडीच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. पत्रकार अर्णब गोस्वामींची अटक हा याचाच भाग असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यात आणीबाणीसदृष्य परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

अर्णब यांचे प्रकरण बंद झाले होते. मात्र, सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांना अटक करायला लावली. समीत ठक्करने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोस्ट टाकल्याने त्याच्या विरोधात दहा शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. या सरकारला राज्यात होणारे महिलांवरचे अत्याचार, पीक कर्जमाफी, पूर परिस्थिती, वीज बिल याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अर्णब यांच्या अटकेमागे निव्वळ राजकारण असल्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत काळ्या फिती घालून भाजप निषेध करणार आहे, असे पाटील म्हणाले.

अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज

महाआघाडी सरकारने मूळ मुद्यांपासून कितीही भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी, पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान, कोरोना, वीज बिलात सवलत आदी मुद्यांवर सरकारला घेरणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

कांजूरमार्ग येथील मिठागाराची जागा केंद्राचीच आहे. एवढेच नव्हे तर या जागेवर माजी आमदार बाफना यांच्या पुत्राने दावा ठोकला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मुंबईतील मेट्रो कारडेशचे काम प्रलंबित राहणार असून, खर्चातही मोठी वाढ होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला.

हेही वाचा - आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर

शिवसेनेचे युवा नेते तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दबावात काम करीत असल्याचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आरोपावर पाटील यांनी माहिती नाही एवढेच वक्तव्य केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant patil says Grand Alliance of Dandukesh Shah in the state