जी हिंमत इतिहासात कुणी केली नव्हती, ती मोदी सरकारने केली; असे का म्हणाले बावनकुळे?

Chandrashekhar Bawankule says Congress should congratulate Narendra Modi
Chandrashekhar Bawankule says Congress should congratulate Narendra Modi

नागपूर : कायदा बदलवण्यास सरकारला बाध्य करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कित्येक वर्षांपासून कमीशनच्या भरवशावर आपली घरे भरणारे शेतकऱ्यांना भडकवत आहेत. पण, शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब आज ना उद्या येईल आणि आंदोलनात फक्त व्यापारी, मापारीच राहतील आणि शेतकरी माघारी फिरतील, असा विश्‍वास राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी जेव्हा मुद्दे मिळत नाहीत, तेव्हा अशा प्रकारची आंदोलने केली जातात. त्यानंतरही पोळी शेकली जात नाही, तेव्हा आंदोलने चिघळविली जातात. नेमके तेच काम विरोधी पक्षांकडून केले जात आहे. सहा बैठकांमध्ये तोडगा न निघण्याचे कारण म्हणजे, प्रत्येक वेळी हे लोक नवीन मागणी घेऊन जातात.

ती मागणी पूर्ण केली की, पुन्हा पेंडॉलमध्ये जाऊन कायदा रद्द करण्याच भाषा करतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मींग वाईट नाही. कारण, एक मोठा शेतकरी १०-१५ शेतकऱ्यांची शेती एकत्रितपणे अत्याधुनिक साधनसामग्रीसह करेल, तेव्हा उत्पन्न चार-पाच पट वाढणारच आहे, असे बावनकुळे म्हणाले.

चार-पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्याकडे अत्याधुनिक यंत्रणा असणे शक्य नाही. त्यामुळे तो पारंपरिक शेती करतो. परिणामी उत्पन्न पाच ते सात किवंटल प्रति एकराच्या पुढे सरकत नाही. पण, अशा १०-१५ शेतकऱ्यांची शेती एकत्रितपणे मोठ्या शेतकऱ्याने केल्यास उत्पन्न चार ते पाच वाढते, हा अनुभव आहे, असे बावनकुळे म्हणाले.

... म्हणून कमीशनखोरांचे धाबे दणाणले

व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लुबाडल्यास नवीन कृषी कायद्याअंतर्गत तक्रार करता येते. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होतो. हे कायदे करण्याची हिंमत इतिहासात कुणी केली नव्हती, ती मोदी सरकारने केली आहे. नवीन कृषी कायद्यामुळे व्यापारी, मापारी शेतकऱ्यांना लुटू शकणार नाहीत. आंदोलनात शेतकरी कमी आणि व्यापारी, मापारीच जास्त आहेत आणि शेतकऱ्यांना भरकटवण्याचे काम केले जात आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने असल्यामुळेच कमीशनखोरांचे धाबे दणाणले आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

कॉंग्रेसने मोदी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांवरून महाविकास आघाडीमधील पक्ष शेतकऱ्यांना भ्रमित करीत आहेत. बाजार समित्या बंद पडणार असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. पण, हे करण्याऐवजी कॉंग्रेसने मोदी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. कारण, त्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असलेले काम सरकारने केले आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com