विधीसंघर्षग्रस्तांना शिक्षा म्हणून करावी लागणार निराधारांची सेवा, कोणी घेतला हा निर्णय?

Changes in punishment for minors
Changes in punishment for minors

नागपूर : मद्य पिऊन वाहन दामटून इतरांचा जीव धोक्‍यात आणणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना यापुढे निराधार वयस्कांची सेवा करावी लागणर आहे. बेजबाबदार मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी भिक्षेकरी गृहातील निराधार वयस्कांची सेवा करावी, असा निर्णय नागपूरच्या बाल न्याय मंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली आहे. 

वाहतूक पोलिस शाखेकडून राबविण्यात येणाऱ्या "ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह' मोहिमेत अडकणाऱ्यांमध्ये बरेचदा अल्पवयीन मुलेसुद्धा असतात. कायद्याप्रमाणे 17 वर्षांखालील मुले विधीसंघर्षग्रस्त ठरतात. मागील काही महिन्यांमध्ये अशी प्रकरणे वाढली आहे. प्रचलित कायद्याप्रमाणे विधीसंघर्षग्रस्त मुलांना बसवूण ठेवण्याची शिक्षा दिली जाते. परंतु, अशा शिक्षेमुळे मुलांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा हेतू पूर्ण होताना दिसत नाही. 

विधीसंघर्षग्रत मुलांना त्यांच्या कृत्याची जाणीव व्हावी, यासाठी त्यांना देण्यात येणारी शिक्षा कायम स्मरणात राहणे गरजेचे आहे. अशा घटनांची त्यांच्याकडून पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी त्यांच्या मनात सेवेचा भाव जागृत होणे गरजेचा आहे. यासाठी नागपूरच्या बाल न्याय मंडळाने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना अनोखी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलांना पाटणकर चौकातील "भिक्षेकरी स्वीकार केंद्रा'त सेवा द्यावी लागणार आहे. गुन्ह्यांच्या स्वरूपावरून बाल न्याय मंडळ सेवेचा अवधी निश्‍चित करेल. तेवढा कालावधी मुलांना सेवा द्यावी लागेल.

भिक्षेकरी केंद्रातील निराधार, वयस्क व ज्यांना भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नाही अशांना सेवा व आत्मियतेची गरज आहे. त्यांना काही वेळासाठी का होईना विचारपूस करणारा व्यक्ती हवा असतो. त्यांची सेवा करताना विधीसंघर्षग्रस्त बालकांना चांगल्या वागणुकीचे शिक्षणही मिळेल व पुढे ते अशा कृत्यापासून लांब राहतील. सेवा करण्याचा आनंद मिळून ते मद्याच्या आहारी जाण्यापासून परावृत्त होतील, असा या निर्णयामागाचा हेतू असल्याचे बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष न्यायाधीश शर्वरी महेश जोशी व प्रमुख न्याय दंडाधिकारी व सदस्य दामोधर यादवराव जोगी यांनी सांगितले. 

व्यसनाला बसू शकेल आळा 
बाल न्याय अधिनीयम 2015 मध्ये मद्यप्राषन करून वाहन चालविणाऱ्या मुलांकडून "कम्युनिटी सर्व्हीस' करवून घेण्याची तरतूद आहे. तोच धागा पकडून विधीसंघर्षग्रस्त बालकांना भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सेवा करवून घेण्याचा निर्णय दोनच दिवसांपूर्वी घेण्यात आला आहे. सेवाकायामुळे व्यसनाला आळा बसू शकेल. 
- दामोधर जोगी, 
प्रमुख न्याय दंडाधिकारी व सदस्य, बाल न्याय मंडळ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com