आजपासून बार, हॉटेलमध्ये ‘रौनक' परतणार

Cheers from today! hotels, bars will open
Cheers from today! hotels, bars will open

नागपूर : मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरंट आणि बार उद्या सोमवारपासून सुरू होणार असल्याने विशेषतः मद्यप्रेमींना ‘मयखाना` खुणावत आहे. त्यामुळे अनेक मित्रांनी आज एकमेकांना फोन करून ‘चलो, कल बैठते है` असा संदेश दिला. मद्य विक्रीची दुकाने सुरू असल्याने आतापर्यंत घरीच ‘पेग' रिचवणाऱ्यांना कधी एकदाचे मित्रांसोबत बारमध्ये बसतो, असे झाले आहे. दुसरीकडे रेस्टॉरंट सुरू होणार असल्याने मित्र, मैत्रिणींना भेटून गप्पा करण्यासाठी बेत आखणे सुरू झाले आहे. 

‘मिशन बिगीन अगेन'अंतर्गत राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून बार व हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पर्यटन विभागाच्या नियमावलीनुसारच बार, हॉटेल सुरू ठेवावे लागणार आहे. हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार ही एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.

सध्या रेस्टॉरंट केवळ पार्सल सुविधांवर सुरू आहेत. उद्यापासून ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना हॉटेलमालकांना कराव्या लागणार आहे. सॅनिटायझरचा वापर, ग्राहकांचा ताप मोजण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. मास्कशिवाय हॉटेलमध्ये कुणालाही परवानगी राहणार नाही. किंबहुना हॉटेलमालकांना तशी पाटीच लावावी लागणार आहे. बारबाबतही हाच नियम कायम राहणार आहे. अटींसह हॉटेल व बारमध्ये प्रवेश करावा लागणार असला तरी शहरातील अनेकजण बारमध्ये बसण्यासाठी आतुर झाले आहेत.

उद्या, पहिल्याच दिवशी नियमावलीचा फज्जा उडण्याची शक्यता बघता बार, हॉटेल्समधील एकूण स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेनेही कंबर कसली आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथकाचे जवान यासाठी सज्ज झाले आहेत. पर्यटन विभागाने नियमावली तयार केली आहे, व्यावसायिक तसेच ग्राहकांनाही त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नमूद केले.

बार, हॉटेलसाठी नियमावली
- बार किंवा हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच स्क्रिनिंग
- लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश
- हॉटेल, बारमध्ये येणाऱ्यांची नोंदणी आवश्यक
- क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश
- दोन टेबलमध्ये एक मीटरचे सुरक्षित अंतर
- टेबल व किचनची स्वच्छता आवश्यक
- सेवा देताना वेटरलाही ग्राहकांपासून लांब राहावे लागेल
- मास्कशिवाय प्रवेश नाही
- ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझरची सोय
- शक्यतोवर कॅशलेस व्यवहारावर भर
- वॉशरूम, हात धुण्याच्या परिसराची सतत स्वच्छता
- सीसीटीव्ही कॅमरे कार्यान्वित ठेवावे लागतील
- वेटर तसेच इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी बंधनकारक
- काऊंटरवर रोख घेणारा आणि ग्राहकांत फ्लेक्सिग्लास स्क्रीन आवश्यक
- कापडाऐवजी विघटनशील नॅपकिनचा वापर
- भांडी गरम पाण्याने स्वच्छ करणे

बारची वेळ परवान्यातील नोंदीनुसार
परवान्यानुसार बार रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परवान्यानुसार बार सुरू ठेवण्याची जी वेळ आहे त्यावेळेपर्यंत सुरू ठेवता येईल, असे महापालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी सांगितले. त्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत बार सुरू राहण्याची शक्यता आहे. यासंबंधात काही बार मालकांशी संपर्क केला असता वेळेबाबत कुठलाही नियम शासनाकडून आला नसल्याचे सांगितले.

नियमभंग झाल्यास बार, हॉटेल सील
सध्या शहरात दुकानदारांसाठी नियमावली ठरली आहे. नियमाची पायमल्ली केल्यास कारवाईही प्रस्तावित आहे. दुकानदाराने
कोव्हिडसंदर्भात नियमांचा भंग केल्यास दुकान सील करण्याची कारवाई केली जाते. अगदी त्याचप्रमाणे बार, हॉटेलमालकांनी नियमावलीचे पालन करण्यास टाळाटाळ केली तर हॉटेल, बारही सील करावे लागतील, असे आयुक्तांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com