पतंग काढणे जिवावर बेतले; ७५ टक्के भाजल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

विजय वानखेडे
Tuesday, 6 October 2020

शासकीय नियमाप्रमाणे पीडित कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. दुसरीकडे ज्या SDPL या वसाहतीत ही घटना घडली आहे, तेथील निवासी अनुराग वर्मा व अन्य लोकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून दगडी सुरक्षाभिंत व तार ओलांडून डॉ. आंबेडकरनगरातील युवक, मुले अनेक कारणांनी प्रवेश करतात.

वाडी (जि. नागपूर) : लटकलेली पतंग काढत असताना विद्युत रोहित्राला स्पर्श झाल्याने ७० टक्के भाजलेल्या १२ वर्षीय प्रज्वलचा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (ता. ५) मृत्यू झाला.

वाडी स्थित आंबेडकरनगर निवासी बबलू ढोके यांचा १२ वर्षीय मुलगा प्रज्वल हा रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पतंग उडवत होता. त्याची पतंग डॉ. आंबेडकरनगरला लागून असलेली कंपाउंड वॉल ओलांडून ‘लेक ह्युव इन्क्लेव’ सोसायटीतील विद्युत रोहित्रावर लटकली. ती पतंग काढण्यासाठी तो भिंत ओलांडून गेला व पतंग काढण्याचा प्रयत्न करू लागला. हे करीत असताना अचानक त्याला विद्युत रोहित्राचा जोरदार झटका लागून दूर फेकला गेला.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

ही बाब आजूबाजूच्या नागरिकांना व परिजनांना माहिती होताच त्याला वाडी स्थित एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर स्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्याच्या सूचना केल्या. तातडीने नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला ७५ टक्के भाजला असल्याचे सांगून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.

मात्र, १२ वर्षीय प्रज्वल उपचाराला प्रतिसाद देऊ शकला नाही. सोमवारी पहाटे त्याचे निधन झाल्याची माहिती मेडिकलच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देताच ढोके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. डॉ. आंबेडकरनगरातही शोककळा पसरली. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश बन्सोड, संतोष नरवाडे, आशीष नंदागवली, राजेश जंगले, रूपेश झाडे, अस्मिता मेश्राम आदींनी घटनेबद्दल शोक व्यक्त करून पालकांनी लॉकडाऊन काळ व शाळा बंद असल्याने मुलावर लक्ष ठेवावे असे त्यांनी आवाहन केले.

ठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु

शासकीय नियमाप्रमाणे पीडित कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. दुसरीकडे ज्या SDPL या वसाहतीत ही घटना घडली आहे, तेथील निवासी अनुराग वर्मा व अन्य लोकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून दगडी सुरक्षाभिंत व तार ओलांडून डॉ. आंबेडकरनगरातील युवक, मुले अनेक कारणांनी प्रवेश करतात. समाजसेवक, पालकांनी असे करण्यापासून मुलांना परावृत्त करावे, अशी विनंती केली आहे. वाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child dies of electric shock in Nagpur Gramin