हे काय चाललंय ? भानेगाव परिसरातील वीटभट्ट्यांवर बालमजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

परिसरात बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून बालमजुरी प्रतिबंधक कायदा केवळ कागदोपत्रीच असल्याचे सर्वसामान्य नागरिकांत बोलले जात आहे.

खापरखेडा (जि.नागपूर) :  मागील अनेक दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या वीटभट्ट्याच्या कामावर बालमजूर अहारोत्र काम करताना दिसतात. अशा कामावर बालकांचे शारीरिक व आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे परिसरात बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून बालमजुरी प्रतिबंधक कायदा केवळ कागदोपत्रीच असल्याचे सर्वसामान्य नागरिकांत बोलले जात आहे. शिवाय प्रशासन याकडे डोळेझाक करीत त्यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही.

क्‍लिक करा  : सावधान ! तुमच्याही भूखंडाचा होउ शकतो लिलाव

कायदा केवळ कागदोपत्रीच?
परिसरातील दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्र बऱ्यापैकी विकसित होत आहे. त्यामुळे येथे विविध उद्योगधंद्यांना चांगले सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. येथील विविध ठिकाणी काम करताना बालमजूर नजरेत पडत असतात. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने बालमजुरीच्या विरोधात कायदा केला. मात्र, खापरखेडा, भानेगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून बालमजुरीचा प्रश्‍न उग्र रूप धारण करीत आहे. खापरखेडा परिसरात काही वीटभट्ट्यांवर कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे ग्राहक पंचायतचे श्रीराम सातपुते यांनी सांगितले. अनेकदा वीटभट्टी नाहीतर काही इतरही दुकानांमध्ये बालमजुरीचे प्रमाण दिसत असून दुकानचालक नियमांना पायदळी तुडवित असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. मजुरांकडून दिवसभर जनावरांप्रमाणे अवजड कामे करून घेतात, शिवाय काम पूर्ण नाही केले तर शिव्याही दिल्या जातात, अशी अवस्था बालमजुरीची असून या बालमजुरांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात नाममात्र फक्त मजुरी दिल्या जाते. त्यामुळे बालमजुरांचे शारीरिक, आर्थिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बालमजुरीचा प्रश्न हा आर्थिक परिस्थितीने मागासलेला असतो आर्थिक परिस्थितीने गांजलेले पालकही त्यांना आर्थिक हातभार लागेल या आशेपोटी कामालाही पाठवितात, अशी चर्चा असून घराच्या उदरनिर्वाहाकरिता हातभार लागावा म्हणून बालकांना कामावर पाठवीत असल्याचे समोर आले. एकीकडे बालपण हे शिक्षण घेऊन सुसंस्कारित आणि खेळण्याचे हे वय असते. पण, परिस्थितीने लाचार होऊन त्यांचे बालपण हिसकावून घेतले जाते.

क्‍लिक करा  : पदवीधर निवडणुकीच्या नोंदणीविषयी उदासीनता

दोषी आढळल्यास कारवाई होणार का?
परिसरात काही ठिकाणी बालमजूर काम करतात, त्यावर प्रतिबंध घालून शासनाने सखोल चौकशी करून संबंधित दोषी आढळणावर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे श्रीराम सातपुते यांनी केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child labor on brick kilns in Bhanegaon area