बालसंरक्षण समितीने थांबविला वाई गावातील बालविवाह 

राजेंद्र मारोटकर
Saturday, 7 November 2020

वाई या गावातील एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. तेथील अधिकाऱ्यांनी वाई ग्रामपंचायतचे सरपंच आणि अंगणवाडीसेविकेला तत्काळ याबाबत सूचित केले.

नागपूर ः तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वाई या गावात बालसंरक्षण समितीच्या दक्षतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह थांबविण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता. ६) करण्यात आली.

वाई या गावातील एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. तेथील अधिकाऱ्यांनी वाई ग्रामपंचायतचे सरपंच आणि अंगणवाडीसेविकेला तत्काळ याबाबत सूचित केले. दोघांनीही संबंधित मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांची समजूत काढली. तसेच बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. त्यामुळे सोमवारी (ता. २) होणारा बालविवाह थांबविण्यात ते यशस्वी झाले.

परंतु मुलीचे आईवडील मुलीचे लग्न कुणाच्या नकळत लावून देणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता. ६) जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांना कारवाईचे निर्दे दिले. त्यानुसार ताबडतोब शुक्रवारीच मुश्‍ताक पठाण, बालविकास प्रकल्प अधिकारी दामोदर कुमरे, साधना हटवार यांनी वाई गावात जाऊन ग्राम बालसंरक्षण समितीची सभा बोलाविली.

सभेला जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांसह सरपंच संजय डफर, पोलिस पाटील रामकृष्ण कराळे, अंगणवाडीसेविका शालिनी धोतरकर, मुख्याध्यापक विजय धवड, संगणक चालक विजय आगे, ग्रामसेविका नारिका कापगते, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती रामापुरे आणि गावकरी उपस्थित होते. सभेमध्ये  मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह करता येणार नाही. तसे न केल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा ठराव पारित करण्यात आला. 

 

`माझी कन्या भाग्यश्री` पोहोचली ७८४ घरांत; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाचा उपक्रम 

हमीपत्र लिहून घेतले      

सभेला उपस्थित सर्वांनी मुलीसोबत मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. तसेच अल्पवयीन मुलीच्या पुनर्वसनाकरिता तिला बालकल्याण समितीसमोर उपस्थित करावे, असे पत्र कोंढाळी पोलिसांना देण्यात आले. 

धक्कादायक! सायंकाळी मुलीने लावला तुळशीजवळ दिवा; वात चोरून उंदराने लावली घराला आग
 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते निर्देश

कोविड-१९ च्या काळात जिल्ह्यात अनेक बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक बोलावून बालविवाह, बालकामगार तसेच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती मिळताच कारवाई करावी, असे निर्देश त्यांना दिले होते.   

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Protection Committee stops child marriage in Wai village