सकाळ इम्पॅक्ट : दहा वर्षांखालील मुलांना लुटता येईल जंगल सफारीचा आनंद; ज्येष्ठांच्या वाटेला प्रतीक्षा

राजेश रामपूरकर
Tuesday, 3 November 2020

शेजारीच असलेल्या राज्यातील पेंचमधील पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना प्रवेशद्वाराजवळून मात्र, पर्यटन न करताच माघारी परतावे लागत असल्याचेही नियम शिथिल करावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत होती.

नागपूर : राज्यातील मेळघाट, पेंच, ताडोबा-अंधारी व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दहा वर्षांखालील मुलांवरील जंगल सफारीचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्यप्रदेशात शिथिलता, महाराष्ट्रात बंदी का? अशा मथळ्याची बातमी ‘सकाळ’ने २० ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली होती. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी बातमीची दखल घेऊन तातडीने बंदीचा निर्णय मागे घेतला. तसेच एका जिप्सीत कुटुंबातील सहा लोकांना बसण्याची परवानगी दिली आहे.

दहा वर्षांखालील मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या सूचनेनुसार एक ऑक्टोबर रोजी राज्यात सुरू झालेल्या निसर्ग पर्यटनास बंदी घातली होती. मात्र, शेजारच्या मध्यप्रदेशने निसर्ग पर्यटनाची ही अट शिथिल केली.

त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली होती. शेजारीच असलेल्या राज्यातील पेंचमधील पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना प्रवेशद्वाराजवळून मात्र, पर्यटन न करताच माघारी परतावे लागत असल्याचेही नियम शिथिल करावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत होती.

अधिक वाचा - कांदा, बटाटा तडकला; लाभ व्यापाऱ्यांना; शेतकऱ्यांचे माप रितेच

ताडोबा-अंधारी प्रकल्प आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे ही बंदी शिथील करावा अशी शिफारस केली होती. त्यानुसार वन्यजीव विभागाने जिप्सीमध्ये एकाच कुटुंबातील सहा व्यक्ती व दहा वर्षाखालील मुलांवरील बंदी उठवली आहे. यापूर्वी जिप्सीमध्ये केवळ चारच व्यक्तींना पर्यटना परवानगी होती. मात्र, ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना जंगल सफारीला मुकावे लागणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children under the age of ten can enjoy a jungle safari