कोरोना काळात धरणे, घोषणा अन्‌ गर्दी, वाचा काय झाले ते...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

रेल्वे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्युटी लावताना काहींवर मेहेरनजर केली जाते तर काहींवर सतत अन्याय केला जात असल्याचा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा आरोप आहे.

नागपूर : कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत असतानाच गुरुवारी रेल्वे रुग्णालयात चांगलाच गोंधळ उडाला. रेल्वे रुग्णालयातील कर्मचारी आणि कामगार संघटना आमने सामने आल्याने परिसरात चांगलीच गर्दी होऊन धरणे, घोषणांचे सोपस्कारही पार पडले. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सोशल डिस्टन्सिंगसह लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडाला.

रेल्वे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्युटी लावताना काहींवर मेहेरनजर केली जाते तर काहींवर सतत अन्याय केला जात असल्याचा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा आरोप आहे. याच विषयावर चर्चेसाठी युनियनचे पदाधिकारी गुरुवारी दुपारी रेल्वे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या हेडाऊ यांच्याकडे जात होते.

झणझणीत सावजी रश्‍श्‍यासाठी खवय्यांना तरसावे लागणार, हॉटेल होणार बंद...

त्याचवेळी चिफ फार्मसिस्ट पाटील कार्यालयात जात होते. दोघेही आमोरासमोर आले आणि वादाची ठिणगी पडली. शाब्दिक वाद वाढत जाऊन गोंधळ उडाला. युनियन पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली.

वाद ऐकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पाटील यांच्या बाजूने उभे राहत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विरोध केला. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी डॉ. हेडाऊ यांची भेट घेत मागण्या रेटल्या. त्यावेळी रुग्णालय परिसरात चांगलीच गर्दी होती. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने कुणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भानगडीनंतर गोंधळासाठी कारणीभूत असणाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले असल्याचे समजते.
 

वॉर्निंग नोटीसमुळे वाद?

एनआरएमयूचा पदाधिकारी असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला 8 जूनला वॉर्निंग नोटीस बजावण्यात आली असून, हेच वादाचे मुख्य कारण असल्याचे समजते. रुग्णालयातील सूत्राच्या दाव्यानुसार नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांने रुग्णाला चुकीचे औषध दिले होते. याच कारणावरून पाटील यांनी त्याला नोटीस बजावली आहे. दबाव निर्माण करण्यासाठी संघटना आक्रमकदा दाखवीत असल्याचे सूत्राचे म्हणणे पडले. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची रोटेशन पद्धतीने ड्युटी लावावी, एवढीच मागणी असल्याचे एनआरएमयूच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 

वरिष्ठांकडे केली तक्रार
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आम्ही चार ते पाच जण गेलो होतो. चिफ फार्मसिस्ट अजय पाटील यांनीच त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतल्याने वाद वाढला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे बोलणे योग्य नव्हते. याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
हबीब खान, मुख्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion of workers' unions at Railway Hospital in Nagpur