काँग्रेसमध्ये गटबाजी : हा प्रकार बंद करा, नाही तर मी निघतो, कोणी दिला हा इशारा...

राजेश चरपे | Tuesday, 4 August 2020

‘ही जागा राजकारण करायची नाही. मी येथे जेवायला आलो आहे. घोषणाबाजी करत असाल तर मी न जेवताच निघतो' असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. नाईलाज झाल्याने कार्यकर्ते शांत बसले. घोषणाबाजी सुरू असताना पालकमंत्री राऊत तेथेच उपस्थित होते.

नागपूर : कॉँग्रेसमधील गटबाजी आता काही नवीन नाही. मुंबई-दिल्लीहून आलेल्या वरिष्ठ नेत्यांनाही त्याचा अनुभव अधुनमधून येतच असतो. सोमवारी नागपुरात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही याचा अनुभव आला. हा प्रकार बंद करा, नाही तर मी निघतो, असा निर्वाणीचा इशारा दिल्याने समर्थक शांत झाले.

बाळासाहेब थोरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले होते. पालकमंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था घरी केली होती. बाळासाहेब येताच पालकमंत्र्यांच्या काही उत्साही समर्थकांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ‘ठाकरे हटाव, काँग्रेस बचा' अशा घोषणा ते देत होते. त्यामुळे थोरात चांगलेच भडकले.

हेही वाचा - हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण...

‘ही जागा राजकारण करायची नाही. मी येथे जेवायला आलो आहे. घोषणाबाजी करत असाल तर मी न जेवताच निघतो' असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. नाईलाज झाल्याने कार्यकर्ते शांत बसले. घोषणाबाजी सुरू असताना पालकमंत्री राऊत तेथेच उपस्थित होते.

नागपूरमधील काँग्रेसची गटबाजी सर्वश्रुत

नागपूरमधील काँग्रेसची गटबाजी सर्वश्रुत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून काँग्रेस नेत्यांमधील मतभेद टोकाला गेले होते. त्यातील राऊत समर्थकांमध्ये सर्वाधिक नाराजी होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म द्यायला गेलेल्या अभिजित वंजारी यांची गाडीसुद्धा रोखली होती. मनपाच्या निवडणुकीच्या निकालानंतरही गटबाजी कायम आहे. फक्त एकमेकांचे समर्थक मात्र आता बदलले आहेत.

अधिक माहितीसाठी - आयुक्त मुंढे व लोकप्रतिनिधी वादावर काय म्हणाले फडणवीस? वाचा

गटबाजी कायम

विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी वरून आदेश आल्यानंतर काही दिवस गटबाजी जवळपास बंद होती. महाअघाडीमध्ये काँग्रेस सहभागी झाला. राऊत यांना ऊर्जामंत्रीसोबतच पालकमंत्रीपद मिळाले. विकास ठाकरे आमदार झाले आहेत. काँग्रेसचा नव्याने कारभार सुरू झाल्याने सर्व काही शांत होईल असे वाटत होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीने काँग्रेसमधील गटबाजी कायम असल्याचे दिसून आले.

संपादन - नीलेश डाखोरे