मोठी बातमी : वादग्रस्त नेता साहील सैय्यदला ठोकल्या बेड्या 

Controversial leader Sahil Syed arrested
Controversial leader Sahil Syed arrested

नागपूर : उपराजधानीत महिनाभरापासून चर्चित असलेला वादग्रस्त नेता साहील ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद (वय 39, रा. बगदादीयानगर, झिंगाबाई टाकळी) याला गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. साहील पत्नीला भेटायला आला होता. पोलिसांना गुंगारा देऊन फरार होण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील सैयदविरुद्ध मानकापूरमधील ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टराला धमकी देणे, फसवणूक करणे आदींसह तीन गुन्हे दाखल आहेत. ऑक्‍टोबर 2018 मध्ये साहील सय्यद, गिरीश गिरीधर, संदीप बन्सोड व त्यांच्या तीन साथीदारांनी समुद्रपूर येथील डॉ. शशांक नत्थुजी चौधरी यांना पिस्तूल दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. बळजबरीने भूखंडाच्या दस्तऐवजावर त्यांची स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे घेतले. हा भूखंड संदीप बन्सोड याच्या नावे केला. 

याबाबत चौधरी यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सय्यद व त्याच्या टोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यासह दोन गुन्ह्यांत साहील हा पोलिसांना हवा होता. साहील हा घरी आल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली.

डॉ. नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्‍त राजमाने यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी प्रवीण रोडे, सागर ठाकरे, सूरज व आशिष हे साहील याच्या घरी गेले. पोलिसांना बघताच साहील घरामागील भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याला पकडले. साहीलला पाचपावलीतील गुन्ह्यात अटक करण्यात आली. सोमवारी साहील याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. 
 

साहील नेमका कुणाचा? 


गेल्या चार दिवसांपूर्वी साहील सैयद याचे जवळपास 20 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये साहील सर्वच मोठ्या पक्षातील मोठमोठ्या नेत्यांसोबत आहे. त्यामुळे साहील नेमका कुणाचा? असा प्रश्‍न पडला आहे. साहील मोठा "सेटलर' असून, पैशासाठी तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 
 

अनेकांचे "राज' उलगडणार 


साहील सैयद याला अटक होताच अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. राजकीय वर्तुळासह गुन्हेगारी विश्‍वातही खळबळ उडाली आहे. आता साहील पीसीआरमध्ये पोलिसांसमोर पोपटासारखा बोलणार आहे. त्याला खाक्‍या दाखविल्यानंतर अनेक "राज' उलगडणार आहे. त्यामुळे अनेक जण आता गुन्हे शाखेच्या फेऱ्यात अडकणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com