कोरोनामुळे नागपुरातील खेळाच्या मैदानांवर शुकशुकाट !

file photo
file photo


नागपूर  : दरवर्षी पावसाळा संपून ऑक्टोबर महिना उजाडला की सराव व स्पर्धांच्या निमित्ताने शहरातील मैदानांवर खेळाडूंची गर्दी होते. अगदी कराटेपासून क्रिकेटपर्यंत खेळांची रेलचेल असते. मात्र कोरोनामुळे यावर्षी मैदाने पूर्णपणे सुनसान आहेत. ना खेळाडू आहेत, ना स्पर्धा होताहेत. नागपूरच्या आतापर्यंतच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच मैदानांवर सन्नाटा दिसतो आहे. 


उपराजधानी संत्र्यासाठी देशविदेशात प्रसिद्ध असली तरी, खेळ आणि खेळाडूही या शहराची आणखी एक ओळख आहे. बाराही महिने शहरातील कानाकोपऱ्यात विविध इनडोअर व आऊटडोअर खेळ सुरू असतात. मात्र यंदाचे वर्ष ह्याला अपवाद ठरले आहे. शहराचा फेरफटका मारला असता बहुतांश मैदानांवर शुकशुकाट दिसून आला. टाळेबंदीमुळे सहा ते सात महिन्यांपासून सर्व 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज' बंद असल्यामुळे ना स्पर्धा सुरू आहेत, ना ही सराव. कोरोनामुळे पहिल्यांदाच अशी स्थिती उद्भवली आहे. साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने खेळांचे हंगाम संबोधले जातात. 


या काळात आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या लीगसह विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित विविध वयोगटांतील क्रिकेट स्पर्धा सुरू असतात. या निमित्ताने व्हीसीएचे सिव्हिल लाइन्स मैदान, जामठा स्टेडियम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मैदान, पोलिस लाइन टाकळीसह ठिकठिकाणच्या मैदानांवर खेळाडू, प्रशिक्षक, पालक व क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मांदियाळी असते. कोरोनामुळे यावर्षी मैदानावर चिटपाखरूही दिसत नाही. दरवर्षीची परंपरा प्रथमच खंडीत झाल्याने खेळाडूंमध्ये कमालीची निराशा आहे. 
सुरुवातीला लॉकडाउन व त्यानंतर अनलॉक पाचमध्येही सरकारने खेळांना परवानगी न दिल्याने खेळाडू सराव सुरू करू शकले नाहीत. सध्याची स्थिती बघता यंदाचा संपूर्ण हंगाम वाया झाल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचे मोठे नुकसान होऊ शकते. विशेषत जुनिअर खेळाडूंना अधिक फटका बसू शकतो. राज्यात पुण्यासह अनेक महानगरपालिकांनी खेळांना परवाणगी दिली. पण नागपूर महानगरपालिकेने अद्याप यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळेदेखील क्रीडा वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे. 


' लॉकडाउनमुळे अख्खा उन्हाळाचा सीझन वाया गेला. पावसाळ्यानंतर नवा सीझन सुरू होईल, अशी आशा वाटत होती. मात्र सरकारने अद्याप परवाणगी दिली नाही. त्यामुळे खूप नुकसान झाले. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका युवा खेळाडूंना बसला आहे. आणखी नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने ताबडतोब खेळांना परवाणगी देणे आवश्यक आहे.' 
-माधव बाकरे, क्रिकेट प्रशिक्षक  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com