नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातही घुसला करोना

Sakal News
Sakal News

नागपूर : कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. या विभागातील सहा कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. केवळ आरोग्य विभागच नव्हे तर नगररचना विभाग आणि गांधीबाग झोन कार्यालयातही कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी अग्निशमन विभागातील १४ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते.

कोरोनाने शहरात पाय पसरले असून शासकीय कार्यालयातही मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे पुढे येत आहे. यात पालिकेचे कार्यालयही आता कोरोनाने कवेत घेतले. मनपाच्या आरोग्य विभागातच कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे येताच चिंतेत भर पडली आहे. ४ ऑगस्टच्या बैठकीत खुद्द आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनीच ही बाब सांगून मनपा प्रशासनास धडकी भरविली. पाठोपाठ नगररचना व गांधीबाग झोनमध्येही करोनाबाधीत कर्मचारी आढळल्याने प्रशासनापुढे चिंतेचा डोंगर उभा राहीला.

शहर सांभाळत असताना स्वत:वर आलेल्या संकटामुळे प्रशासनाची धाकधुक वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागात सापडलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाबद्दल आरोग्य विभागा मौन बाळगून आहे. शहरात लक्षणे असलेल्या व नसलेल्या अशा पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात येत आहे. अशांची यादीही तयार होत आहे. मात्र, मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची माहिती मात्र लपवून ठेवण्यात आली. यासंदर्भात डॉ. सवई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. प्रभारी उपायुक्त अमोल चोरपगार यांनी हा आकडा एक असल्याचे सांगितले. दरम्यान, नगररचना विभागातही दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आली.

अग्निशमन विभागातही कोरोनाबाधितांची संख्या अठरापर्यंत पोहोचली.

सहायक आयुक्तांसह १२ जण बाधित, झोन बंद

गांधीबाग झोनमधील १२ जण कोरोनाबाधित आढळले. यात सहायक आयुक्तांसह झोनल आरोग्य अधिकारी, कोरोनासाठी नियुक्त झोनल वैद्यकिय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, ३ जमादार व इतर असे एकूण बारा जणांचा समावेश आहे. झोनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने गांधीबाग झोन कार्यालय सहा दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

संपादन-अनिल यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com