कोरोना योद्ध्यांचीच उपचार अन् बेडसाठी वणवण, महापालिकाही देत नाही आधार

corona fighters not getting treatment and beds in nagpur
corona fighters not getting treatment and beds in nagpur

नागपूर : महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक, आरोग्य विभागातील नर्स, कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात प्रशासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु, त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचार तसेच बेडसाठी वणवण भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडूनही त्यांना आधार दिला जात नसल्याने कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीतही महापालिकेचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी, नर्स व इतर कर्मचारी, आशा वर्कर्स कर्तव्य समजून कोरोनावर नियंत्रणासाठी थेट वस्त्या, मोहल्ल्यात जात आहेत. कुणी लसीकरण केंद्रावर कुणी चाचणी केंद्रांवर सेवा देत आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही लागण होत आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचार तसेच गंभीर झाल्यास बेडसाठी कर्मचाऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. नुकताच महापौर कक्षातील एका कर्मचाऱ्याला वेळेवर बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. याशिवाय लक्ष्मीनगर झोनमधील एका अभियंत्याचाही याच पद्धतीने जीव गेला. प्रशासनाकडून बेड मिळवून देण्यासाठी कुठलाही प्रयत्न होत नसल्याने कर्मचाऱ्यांत संताप आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबत महापालिकेतील कर्मचारी संघटना राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनकडे तक्रार केली. असोसिएशनने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे यापूर्वीच केली. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. प्रशासन कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर ते जीव धोक्यात कसा टाकतील? असा सवाल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, उपाध्यक्ष ईश्वर मेश्राम, महासचिव रंजन नलोडे, संजय मोहळे, प्रवीण तंत्रपाळे यांनी उपस्थित केला आहे.  

महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक, सफाई कामगार त्रस्त आहेत. त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे शक्य नाही. महानगरपालिकेने आयसोलेशन दवाखाना व गांधीनगरातील इंदिरा गांधी रुग्णालयात सर्व सुविधायुक्त प्रत्येकी १० बेड मनपा कर्मचारी, शिक्षक व सफाई कामगार, इतर कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावी. 
- सुरेंद्र टिंगणे, अध्यक्ष, राष्ट्रीय नागपूर कोर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशन. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com