४० हजारांचे इंजेक्शन लावले तरी वाचला नाही जीव, आता कुटुंबीयांचा डाॅक्टरांवर आरोप

केवल जीवनतारे
Monday, 5 October 2020

भीमराव उमक यांना १७ सप्टेंबरला मेयोत दाखल करण्यात आले होते. मेयोत योग्य उपचार होत नाही असे कारण देत येथून नातेवाईकांनी सुटी घेतली. रेल्वे रुग्णालयाच्या मध्यस्थीने १९ सप्टेंबरला त्यांना कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

ऩागपूर  ः गोधनी येथील ६५ वर्षीय भीमराव रायभान उमक मेयोतून सुटी घेऊन मानकापूर येथील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल झाले. दाखल होताच ४० हजार रुपयांचे इंजेक्शन लावले. लगेच प्लाझ्मा दिला गेला. या उपचाराने कोरोना रुग्ण बरा झाला. मात्र, त्यांना कावीळ झाला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयाने मात्र नातेवाईकांचे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.

भीमराव उमक यांना १७ सप्टेंबरला मेयोत दाखल करण्यात आले होते. मेयोत योग्य उपचार होत नाही असे कारण देत येथून नातेवाईकांनी सुटी घेतली. रेल्वे रुग्णालयाच्या मध्यस्थीने १९ सप्टेंबरला त्यांना कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचारानंतर कोरोना बरा झाला असे डॉक्टरांनी सांगितले. नंतर मात्र डॉक्टरांनी रुग्णाला कावीळ झाल्याचे सांगितले. 

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
 

काविळमुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पुढे यकृत निकामी झाले. किडनी निकामी झाली असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सोळाव्या दिवशी ते दगावले. मात्र चार तासानंतरही मृतदेह दिले नाही. पोलिसांत तक्रार केल्यानंतर शव देण्यात आल्याची व्यथा सुनील उमक यांनी बोलून दाखवली. या प्रकारामुळे काही काळ हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. चालता बोलता रुग्ण दगावल्यामुळे डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी आहे.

आरोपात काहीही तथ्य नाही
मेयोतून रुग्णाला येथे आणले तेव्हा स्थिती वाईट होती. त्यांच्यावर सर्व उपचार करण्यात आले. उपचारासंदर्भातील सर्व नोंदी रुग्णालयाकडे आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. पोलिसांना बोलावण्यात आल्यानंतर प्रकरण निवळले. नातेवाईकांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.
-डॉ. श्रीवास्तव, संचालक, कुणाल हॉस्पिटल, मानकापूर, नागपूर. 

मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमधील एक्सरे युनिट बंद

कोरोना बाधितांवरील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ६०० खाटांचे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचाराची दिशा ठरविण्यासाठी छातीचा एक्स रे काढण्यात येतो. यातून फुफ्फुसांमधील जंतूसंसर्गाचे निदान करण्यात येते. मात्र मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये असलेले दोन पोर्टेबल एक्सरे यंत्रच मागील काही दिवसांपासून बंद आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा येथे पसरली आहे. धक्कादायक बाब अशी की, कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे एक्सरे काढण्यासाठी अन्य वॉर्डात पाठवून एक्सरे काढले जात आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग परसण्याची भीती आहे.

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient dies during treatment, relatives accuse doctors