हातावर तूरी देऊन कोरोनाबाधित पळाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

कंपनीच्या मालकाचा मुलगा कोरोनाबाधित आढळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात आल्याने या तरुणासह इतरही काहीं जणांना पाचपावली विलगीकरण केंद्रात खबरदारीचा उपाय म्हणून ठेवण्यात आले. या तरुणालाही कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.

नागपूर : एका टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला असलेला पंचेविशीतील युवक. कंपनी मालकाच्या मुलाच्या संपर्कात आला आणि त्याला कोरोना झाला. या कंपनीतील सहा जणांना कोरोना झाला. या साऱ्यांना पाचपावली विलगीकरण केंद्रात ठेवले. मात्र यातील पंचेविशीतील एक कर्मचाऱ्याने मी रुग्णवाहिकेत बसतो, असे सांगून नजरेआड झाला. हळूहळू एक एक पाऊल टाकत तो पळून गेला. रुग्णाहिकेत सहा ऐवजी पाच जण दिसल्याने डॉक्‍टर, पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. परंतु बराच वेळ उलटून गेल्यानंतरही तो सापडला नाही. 

नागपुरच्या पाचपावलीतील ही घटना पुढे आल्याने सारे प्रशासनात खळबळ उडाली. एकमेकांचे मोबाईल खणखणू लागले. याला फोन त्याला फोन करून त्याच्या घरचा पत्ता शोधला, परंतु रुग्णवाहिकेत बसलेल्या एकाला तो रेल्वेरुळावरून चालत दिसला. तो ओरडला, तो बघा....रुग्णवाहिका त्या दिशेने नेली, परंतु तो नजर चुकवून कुठे गेला, कळेना. पोलिसांनी त्या कोरोनाबाधित युवकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु त्यांच्याकडे पीपीई किट नाही. ते घाबरले. आपल्याला कोरोना होईल या भितीने त्याच्याकडे कोणी जाण्यास तयार नव्हते. अखेर पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांनी कर्तव्य पार पाडले. पुढे या बाधिताला रुग्णालयात हलवण्यात आले. 

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा 

उपराजधानीतील गुलशननगर येथील 25 वर्षीय तरुण. एका टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला असलेला हा तरुण कामाचे निश्‍चित तास नसल्याने कंपनीतच राहात होता. रात्रीअपरात्री कामावर उपस्थित राहात होता. कंपनीच्या मालकाचा मुलगा कोरोनाबाधित आढळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात आल्याने या तरुणासह इतरही काहीं जणांना पाचपावली विलगीकरण केंद्रात खबरदारीचा उपाय म्हणून ठेवण्यात आले. या तरुणालाही कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या केंद्रातील इतरही पाच जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सहाही जणांना शनिवारी रात्री रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. रुग्णालयात पोहोचवण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली होती. 

पीपीई किट घालून त्याला पकडले... 

रात्रीचे जेवण घेऊन कंत्राटदार येथे पोहोचला होता. विलगीकरण केंद्राचे दार उघडून जेवण आत घेत असताना कोरोनाबाधित तरुण "मी कोरोनाबाधित आलो आहे. रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका बाहेर आली आहे', असे सांगत तो बाहेर निघून गेला. काही वेळातच इतर पाच जण रुग्णवाहिकेत बसले. त्या वेळी हा तरुण दिसला नाही. एकाला तो रेल्वे रुळाकडे तो जात असताना दिसला. त्याने ही माहिती अधिकाऱ्यांना सांगितली. ही माहिती वरिष्ठांसह पाचपावली पोलिसांना दिली. पोलिसांनाही संक्रमणाची भीती होती. त्यांनी प्रथम रुग्ण घरातच लपला असल्याचा शोध लावला. या घरावर पाळत ठेवत नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेसह तेथे बोलावण्यात आले. त्यानंतर वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) किट घालून आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान रुग्णाला ताब्यात घेत विलगीकरण केंद्रात आणले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी रुग्णाला रुग्णालयात हलवले गेले. दरम्यान, तरुण त्याच्या घरातील काहींच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यांनाही विलगीकरणात घेण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient escaped unharmed