‘मृत्यू जवळ आला आहे, मेडिकलमध्ये चला’; कोरोनाबाधितांना शेवटच्या क्षणी दाखवला जातो रस्ता
विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले आहेत. त्यातच शहरातील मेडिकलमध्ये १,४०० पेक्षा अधिक मृत्यू झाले. तर मेयोतही १,२०० पेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील ११५ सरकारी व खासगी रुग्णालयात ९१० कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत.
नागपूर : खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय घोषित करण्यात आले. मात्र, येथे उपचार घेणारा कोरोनाबाधित अत्यवस्थ होताच मेडिकल व मेयोत रेफर करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, खासगीतून मेयो मेडिकलमध्ये रेफर करताना विविध क्लुप्त्या वापरण्यात येत होत्या. खासगीतून रेफर करण्यात आलेल्यांपैकी ९५ टक्के मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले आहेत. त्यातच शहरातील मेडिकलमध्ये १,४०० पेक्षा अधिक मृत्यू झाले. तर मेयोतही १,२०० पेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील ११५ सरकारी व खासगी रुग्णालयात ९१० कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत.
उपचारादरम्यान अनेक कोरोनाबाधितांजवळचे पैसे संपल्यानंतर त्यांना मेयो किंवा मेडिकलमध्ये रेफर करण्यात येत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. अशा अनेक रुग्णांना मेडिकल मेयोत रेफर करण्यात करण्यात येत होते.
मेडिकल प्रशासनाने यासंदर्भात केलेल्या निरीक्षणात विविध सरकारी तसेच खासगी रुग्णालयातून सुमारे तीनशेच्या जवळपास रुग्णांना अत्यवस्थ स्थितीत हालवण्यात आले. त्यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे २२५ रुग्णांना खासगी रुग्णालयातून येथे आले होते. एकट्या मेडिकलमध्ये २१४ जणांना हलविले. यातील १४४ जण खासगीतून हलवण्यात आले. त्यांना हलवण्यात आल्यानंतर लगेच काही तासांच्या अवधीत मृत्यू झाला.
क्लिक करा - पीक वाचविण्यासाठी टँँकरने रस्त्यावर पाणी
मध्यरात्री हलवण्याचे प्रमाण अधिक
खासगी रुग्णालयात अनेक कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर असतानाही मध्यरात्री १२ नंतर मेडिकलमध्ये हलवण्यात आले. या रुग्णांना हलवण्यापूर्वी मेडिकल प्रशासनाला कुठलीही सूचना दिली जात नव्हती. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत होती. परंतु, या रुग्णांना स्वीकारून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. खासगीत मृत्यूचा टक्का कमी असल्याचे दाखवण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याची चर्चा मेडिकल मेडिकल वर्तुळात आहे. विशेष असे की, अनेक शासकीय रुग्णालयातून हलवलेल्यांपैकी ४७ कोरोनाबाधित दगावले.
संपादन - नीलेश डाखोरे