कोरोनाचा कहर! नागपुरात रुग्णांचा आकडा २० हजार पार..जाणून घ्या आजची आकडेवारी 

Corona patients crossed 20 thousand mark in Nagpur
Corona patients crossed 20 thousand mark in Nagpur

नागपूर : कोरोनापासून बचावासाठी महापालिकेकडून अनेकदा जनजागृती, आवाहन करण्यात आल्यानंतरही बेजबाबदार नागरिकांकडून होणाऱ्या गर्दीचे रुपांतर आता बाधितांच्या गर्दीत होत असल्याचे दिसून येत आहे. आज एकाच दिवशी ४६ कोरोनाबळींची नोंद झाली असून बाधितांचा एकूण आकडा २० हजारांवर पोहोचला. शहराच्या विविध लॅबमधून आलेल्या नमुने तपासणीतून रविवारी ८२४ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे मृत्यूसत्र तसेच बाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आता उभे राहिले आहे.

कोरोनाबळींचा सातत्याने आलेख वाढत असून रविवारी झालेल्या ४६ मृत्यूंसह बळींची संख्या ७३० पर्यंत पोहोचली. आज नोंद झालेल्या मृत्यूमध्ये शहरातील ४२ जणांचा समावेश असून नागपूर ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. एकूण बाधितांमध्ये शहरातील ५४४, ग्रामीणमधील १०५ तर जिल्ह्याबाहेरील नागपुरात उपचार घेत असलेल्यांची संख्या ८१ आहे. शहरातील मेडिकल, मेयो, एम्स, नीरीसह खाजगी लॅब तसेच ॲंटीजन टेस्टमधून ८२४ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. 

मेयोत तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यातून ८६, एम्समधून १, नीरीतून ४५, खाजगी लॅबमधून २९१ तर ॲंटीजन टेस्टमधून ४०१ जणांना कोरोनाचे निदान झाले. ऩव्या बाधितांसह एकूण बाधितांची संख्या २० हजार ४३९ वर पोहोचली. यात शहरातील १५ हजार ४०९ तर ग्रामीण भागातील ४७७० तर जिल्ह्याबाहेरील २६३ जणांचा समावेश आहे. दरम्यान आज ८१४ जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ११ हजार ५३ नागरिकांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत २ हजार ७८३ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत असून घरी ५८७३ रुग्ण उपचार घेत आहेत. 

महापौर संदीप जोशी आक्रमक 

शहरातील अनेक नागरिक घरीच उपचाराला पसंती देत असल्याचे आज महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही स्पष्ट केले. मात्र गरज पडल्यास दहा हजारांवर बेड उपलब्ध असल्याने त्यांनी नमुद केले. महापौर संदीप जोशी यांनी मात्र विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांना फटकारत वाढत्या कोरोनाबाधितांसाठी बेजबाबदार नागरिकांना लक्ष्य केले. 

घरी विलगीकरणच्या नावावर मोकाट रुग्ण 

गेल्या काही दिवसांत शहरात उत्सवानिमित्त सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. एवढेच नव्हे अनेक पॉजिटिव्ह रुग्णांना घरी विलगीकरणच्या नावावर मोकाट सोडण्यात आले आहे. अनेकांची तपासणी झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत अहवाल दडवून ठेवला जात आहे. त्यामुळे पॉजिटिव्ह असलेले रुग्णही बिनधास्त फिरत आहे. यातून संक्रमण वाढून दररोजच्या बाधितांमध्ये हजारोंच्या आकड्याची भर पडत आहे.

कोरोनावर मात करणारे मेडिकलमधील सर्वाधिक

आतापर्यंत ११ हजार ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात सर्वाधिक रुग्ण मेडिकलमधील आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेले १५२३ जण कोरोनामुक्त झाले. मेयोत उपचार घेणारे ९६३ जण कोरोनामुक्त झाले तर एम्समधील ३८० जणांनी कोरोनावर मात केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com