esakal | आजि सोनियाचा दिनु! कोविड लसीकरणाला होणार सुरुवात; तब्बल १२ केंद्रांवर जय्यत तयारी  
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccination starting from !6 January in Nagpur Latest News

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली कोविड लसीकरण मोहिमेला शहरातील पाच केंद्रातून सुरवात होत आहे. शहरासाठी २२ हजार लस पोहोचल्या आहेत. नोंदणी झालेल्या साडेबावीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात लस देण्यात येणार आहे.

आजि सोनियाचा दिनु! कोविड लसीकरणाला होणार सुरुवात; तब्बल १२ केंद्रांवर जय्यत तयारी  

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १६ जानेवारीला कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात करणार असून त्यानंतर जिल्ह्यात आरोग्यसेवकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. शहरातील पाच तर ग्रामीण भागातील सात केंद्रांवर लसीकरणासाठी अनुक्रमे महापालिका व जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली. उद्या लसीकरण करण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील १२०० आरोग्य सेवकांना उशिरा रात्रीपर्यंत केंद्राबाबत एसएमएसद्वारे माहिती पाठविण्यात आली.

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली कोविड लसीकरण मोहिमेला शहरातील पाच केंद्रातून सुरवात होत आहे. शहरासाठी २२ हजार लस पोहोचल्या आहेत. नोंदणी झालेल्या साडेबावीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात लस देण्यात येणार आहे. शहरातील मेडिकल, मेयो, डागा रुग्णालय, एम्स आणि मनपाचे पाचपावली सुतिकागृहात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. 

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. या केंद्रांना भेट देणार आहेत. ग्रामीण भागात रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेरमधील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कळमेश्वर येथील गोंडखैरी प्राथमिक या सात आरोग्य केंद्रावर लस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात कामठी येथील सैनिकांसाठी ५०० तर ग्रामीण भागासाठी १७ हजार सहाशे लस उपलब्ध राहणार आहे. एकाला दोन डोस, होणारे नुकसान बघता ग्रामीण भागात ८ हजार नागरिकांनाच ही लस दिली जाईल. अर्थात शहर व ग्रामीणमधील एकूण ३५ हजारपैकी १८ हजार आरोग्यसेवकांनाच लस दिली जाणार आहे.

केंद्रावर असे होईल लसीकरण

  • लस लावण्यापूर्वी आरोग्यसेवकांच्या नावाची तपासणी.
  • आरोग्यसेवकांची तापमान मोजणी तसेच सॅनिटाईज केल्यानंतर प्रतीक्षागृहात रवानगी.
  • आरोग्यसेवकांची ओळख पटल्यानंतर कोविड पोर्टलवर नोंदणी.
  • लसीकरण केल्यानंतर अर्धा तास आरोग्यसेवकांचे निरीक्षण.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

लसीकरणाबाबत पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. सीईओ योगेश कुंभेजकरसह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. 

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

मनपातर्फे प्रत्येक केंद्रावर दररोज १०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांतील इतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचारी व पोलिस कर्मचारी तैनात राहतील.
- राम जोशी, 
अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

संपादन - अथर्व महांकाळ