फूल बाजारात नाही राहिला ‘राम'; का आली ही वेळ जाणून घ्या

Coronavirus Is Crushing the Nagpur Flower Market
Coronavirus Is Crushing the Nagpur Flower Market

नागपूर : श्रावण महिन्यात सण- उत्सवांमुळे फुलांच्या मागणीत विक्रमी वाढ होत असते. परंतु यंदा कोरोनामुळे शहरातील सर्वच प्रमुख मंदिरे कुलूप बंद आणि श्रावण महिन्यातील सण, सार्वजनिक उत्सवावरही सरकारने बंदी घातली आहे. त्याचा फटका शहरातील फुल विक्रीला बसल्याने फुलांचा बाजार कोमेजला आहे. फुलांना मागणी नसल्याने नेताजी मार्केटमधील विक्रेते आणि शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

येथील नेताजी मार्केटमध्ये दररोज सकाळी फुलबाजार भरतो. दररोज १५ ते २० लाखांच्या फुलांची विक्री होते. कोरोनामुळे प्रशासनाने मार्चपासून मंदिरे, कार्यालये कुलूपबंद केल्याने सहाजिकच फुलबाजारावर परिणाम झाला आहे. शहरात अनेक गावांतील फुल उत्पादक सकाळी फुले विक्रीसाठी येतात. झेंडू, गुलाब, शेवंती, देशी गुलाब, डच गुलाब, कलर अशी सर्वच प्रकारची फुले उपलब्ध होतात. त्यामुळे शहरातील किरकोळ फुल विक्रेत्यांसह विविध मंदिरांजवळ फुलविक्री करणारे खरेदीसाठी येत आहेत. आता शासनाने अनेक व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. परंतु अद्यापही देवदर्शनास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ऐन श्रावणातही मंदिरे खुली होऊ शकली नाहीत. सध्या फक्त २० टक्केच फुलांची आवक होत असून त्यातील १० ते १५ टक्केच फुलांची विक्री होत आहे. कृष्ण जन्मष्टमीनिमित्ताने बाजारात ग्राहकांची फुल खरेदीसाठी गर्दी असते आज मात्र, ग्राहकानी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. 

पाचपन्नास नातलगांच्या उपस्थितीत विवाह पार पडल्याने त्याचाही प्रतिकूल परिणाम फुल व्यवसायावर झाला अशे अरोमा फ्लॉवरचे संचालक जयंत रणनवरे यांनी सांगितले. सर्वच शिव मंदीरे बंद असल्याने बेलाच्या पानांनाही मागणी नव्हती. या महिन्यातच २१ तारखेला हरतालीका, २२ तारखेला गणरायाचे आगमन होणार आहे. त्यानंतर २५ ऑगस्टला जेष्ठागौरी आवाहन, दुसऱ्या दिवशी गौरी पुजा आहे. यासाठी विविध फुलांच्या हारांची मोठी मागणी असते. या सोहळ्यांवरही कोरोनाचे सावट राहणार आहे. 

किरकोळ व्यापारी अडचणीत 

कोरोनाच्या संसर्गामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याने श्रावण महिन्यात फुलांच्या बाजारातील चैतन्य हरविले आहे. किरकोळ दुकानदार आपला चरितार्थ चालविण्यासाठी बाजारात फुले खरेदीसाठी येतात. त्यांच्याही व्यवसायात ‘राम' उरला नसून कारागिरांचे वेतन काढणेही कठीण झालेले आहे. शहरात सध्या जिल्ह्यातील फुलांची आवक सुरू असून काही प्रमाणात कर्नाटकातून फुले येत आहेत.  
-जयंत रणनवरे, संचालक, अरोमा फ्लॉवर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com