न्यायालयाने अर्ज फेटाळला ; रेवतकर, पडोळे मध्यवर्ती कारागृहात 

नरेंद्र चोरे
Monday, 26 October 2020

गेल्या चौदा दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या रेवतकर व पडोळेने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर सोमवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता दोघांचाही मुक्काम पुढील काही दिवस मध्यवर्ती कारागृहात राहणार आहे.

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी माजी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे दोघांनाही मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. 

गेल्या चौदा दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या रेवतकर व पडोळेने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर सोमवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता दोघांचाही मुक्काम पुढील काही दिवस मध्यवर्ती कारागृहात राहणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार औरंगाबादचा अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगर यांनाही ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मानकापूर पोलिसांनी १८ तास दिवसरात्र सर्च ऑपरेशन करून दोघांनाही गेल्या गुरुवारी औरंगाबादमधून अटक केली होती. याच रॅकेटमध्ये सहभागी राठोडचे साथीदार पांडुरंग बारगजे व शंकर पतंगे पळून जाण्यात यशस्वी ठरले. 

 

हेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*

 

चौकशीदरम्यान त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यात येत असल्याचे मानकापूर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात पाळेमुळे रुजलेल्या या घोटाळ्यात विविध ठिकाणी आतापर्यंत अनेक क्रीडा अधिकारी, लाभार्थी व टोळीतील म्होरक्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे सर्व जण संगनमताने बोगस प्रमाणपत्र विक्री करून मलिदा लाटत होते. लाखो रुपयांत विकत घेतलेल्या या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर अनेक बनावट खेळाडूंनी विविध विभागांमध्ये शासकीय नोकऱ्या मिळविल्या आहेत. 

संपादन : प्रशांत रॉय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court Rejected Bail application; Rewatkar, Padole in Central Jail