ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे पडले महागात; छायाचित्रकाराविरुद्ध गुन्हा

Crime against the photographer in Nagpur
Crime against the photographer in Nagpur

नागपूर : परवानगी न घेता लग्नसमारंभात ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे एका छायाचित्रकाराला चांगलेच महागात पडले. छायाचित्रकाराविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंकज जयदेव भंडारकर (वय ३६, रा. बिनाकी मंगळवारी, कुंदनलाल गुप्तानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या छायाचित्रकाराचे नाव आहे.

१२ डिसेंबरला सिव्हिल लाईन्समधील ब्लेसिंग लॉन येथे लग्न समारंभ होता. यावेळी पंकज हा ड्रोनद्वारे चित्रीकरण करीत होता. या भागात रिझर्व्ह बँक, न्यायालय व अन्य महत्त्वाचे शासकीय कार्यालये आहेत. या भागाला प्रतिबंधित क्षेत्रही घोषित करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिसांची परवानगी आवश्यक आहे.

परवानगी न घेता पंकज हा ड्रोनद्वारे छायाचित्रीकरण करीत होता. याबाबत पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांना माहिती मिळाली. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दुर्गेश, प्रलेश कापसे, कुशाल व धीरज यांनी पंकज याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे ड्रोन जप्त केले. पंकज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी छायाचित्रकारांनी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी, असे आवाहन अमोल देशमुख यांनी केले. 

व्यापाऱ्याची ९७ लाखांनी फसवणूक

कांतिलाल मदनलाल मकवाना (वय ४७, रा. नेताजीनगर) यांचा लाकूड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. दोघांनी विमानाच्या भंगार विक्रीत गुंतवणूक केल्यास दहापट अधिक पैसे देण्याचे आमिष मकवाना यांना दाखविले. २०१८ मध्ये मकवाना यांनी दोघांना वेळोवेळी ९७ लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर दोघांनी मकवाना यांना मोबदला दिला नाही. तपासानंतर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी कळमन्यात गुन्हा दाखल केला. मकवाना यांच्यावर ६० लाख रुपयांची उधारी आहे. कर्ज काढून त्यांनी ही रक्कम दोघांकडे गुंतवली होती, अशी माहिती आहे.

ट्रकमधून सामान चोरी करणारा जेरबंद

यशोधरानगर परिसरात उभ्या ट्रकमधून डीझेल आणि इतर सामानाची चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपी राणी दुर्गावती चौक निवासी शुभम नवीनराव उके (२५) आहे. गेल्या ७ ऑगस्टला अब्दुल्ला खान यांनी त्यांचा ट्रक यशोधरानगर परिसरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या साइटवर उभा करून ठेवला होता. मध्यरात्रीला शुभमने ट्रकच्या केबिनचे काच फोडून आत प्रवेश केला. २०० लीटर डीझेल, जॅक आणि इतर सामानासह ४३,३०० रुपयांचा माल चोरी केला. 

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com