गुन्हे शाखेच्या निरीक्षकाने केली मारहाण; युवकाने थेट गृहमंत्री, पोलिस आयुक्तांकडे केली तक्रार, काय असावे कारण...

Crime Branch inspector beats youth
Crime Branch inspector beats youth

नागपूर : एका व्यक्‍तीला उधार दिलेले पैसे परत न मागण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाने मारहाण करून युवकाकडील सोनसाखळी व ब्रासलेट हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. युवकाने गृहमंत्री अनिल देशमुख व पोलिस आयुक्तांकडे पोलिस निरीक्षकाची तक्रार केली आहे. तक्रार दिल्यानंतरही अद्यापही निरीक्षकाविरुद्ध कारवाई न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजा जमशेद शरीफ (वय 26, रा. एहबाब कॉलनी, अनंतनगर) असे तक्रारदार युवकाचे नाव आहे. 

राजाने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर महिन्यात अशफाक अली (वय 50) यांच्यासोबत राजाची ओळख झाली. अशफाक यांनी राजा याला 14 लाख रुपये उधार मागितले. राजाने अशपाक यांच्याशी लिखित करार केला. त्यांना 14 लाख रुपये दिले. अशपाक यांनी दोन धनादेशही राजाला दिले. करारानुसार मार्च महिन्यात अशपाक हे राजाला ही रक्कम परत करणार होते. मात्र, अशपाक यांनी राजाला पेसे परत केले नाही.

नऊ मार्चला गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी राजाला लाकडापूल येथील कार्यालयात बोलाविले. 12 मार्चला राजा गुन्हेशाखेच्या कार्यालयात गेला. चौधरी यांना राजा याला शिवीगाळ केली. अशफाकला दिलेले पैसे विसरून जा, अन्यथा वाइट परिणाम होतील, अशी धमकी देत अशफाक यांना धनादेश व करारपत्र परत करण्यास सांगितले. 

राजाने नकार देताच चौधरी यांनी राजाला मारहाण केली. राजाकडील दागिने हिसकावण्याचाही प्रयत्न केला. मारहाणीत राजाला गंभीर दुखापत झाली. मेयो हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर राजा खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. खासगी हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर राजाने गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय व पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्याकडे पोलिस निरीक्षकाने मारहाण केल्याची तक्रार केली.

शहानिशा करून नियमानुसार कारवाई 
तक्रारीची शहानिशा करून सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर दोषी आढळल्यास पोलिस निरीक्षकाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, 
पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com