"लक्ष्मीची मूर्ती घ्या होss"; बोलावूनही ग्राहक काही फिरकेना; विक्रेत्यांना कोरोनाचा मार

नरेंद्र चोरे
Tuesday, 10 November 2020

बाजाराचा फेरफटका मारला असता जागोजागी दुकानदारांनी लक्ष्मीच्या मूर्त्यांची दुकाने थाटल्याने दिसून आले.

नागपूर  : दिवाळी म्हटली की घरोघरी लक्ष्मीचे पूजन होते. परिस्थिती कितीही बेताची असली तरीसुद्धा प्रत्येक जण घरी लक्ष्मीची स्थापना करतो. मात्र दिवाळी तोंडावर असूनही मागणी नसल्यामुळे दुकानदार निराश आहेत. कोरोनामुळे यावर्षी मागणी कमी असल्याचे लक्ष्मी विक्रेत्यांनी सांगितले.

बाजाराचा फेरफटका मारला असता जागोजागी दुकानदारांनी लक्ष्मीच्या मूर्त्यांची दुकाने थाटल्याने दिसून आले. मात्र सध्या ग्राहक फिरकत नसल्याने दुकानदार निराश आहेत. आपली व्यथा सांगताना सक्करदरा येथील महेश सदावर्ते म्हणाले, मी गेल्या सहा- सात वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. दिवाळीच्या आठ दिवसांपासूनच ग्राहक मुर्त्या खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. मात्र यावेळी ग्राहक क्वचितच येत आहेत. 

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

कोरोनामुळे यंदा खूपच कमी प्रतिसाद आहे. तथापी लक्ष्मीपूजनाला तीन- चार दिवस शिल्लक असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याच परिसरात मुर्त्या विकणारे लेखराज लारोकर यांनीही यंदा कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असल्याचे सांगितले.

बाजारात सध्या आठ इंचपासून एका फुटापर्यंत पीओपी आणि मातीच्या दीडशे ते पाचशेदरम्यान आकर्षक मुर्त्या उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मूर्त्यांची किंमत १० ते २० टक्क्यांनी अधिक आहे. गणेशोत्सवाचे वेळी विक्री कमी झाल्याने यावेळी बहुतांश दुकानदारांनी सावध पवित्रा घेत मूर्त्यांचे ऑर्डर कमी दिले.

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

' कोरोनाकाळात सत्तर हजार रुपये खर्च करून मी अमरावती येथून लक्ष्मीच्या मुर्त्या आणल्या. गणेशोत्सवादरम्यान जबर आर्थिक फटका बसल्यानंतर दिवाळीत चांगली कमाई होईल, अशी आशा होती. मात्र ग्राहक येत नसल्यामुळे दिवाळीसुद्धा तोट्यात जाईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. '
-महेश सदावर्ते, 
लक्ष्मी मूर्ती विक्रेते

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: customers are not buying lord laxmi idol in this diwali