अधिष्ठाता डॉ. मित्रा यांचा  स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज 

केवल जीवनतारे
Sunday, 11 October 2020

ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ आणि गुडघा, हिप प्रत्यारोपात डॉ. मित्रा यांचा हातखंडा आहे. त्यांनी सिकलसेलबाधितांवर मोठ्या प्रमाणात हिप रिप्लेसमेंट केले आहे. हृदय प्रत्यारोपण युनिटच्या उभारण्यासोबतच फुप्फुस आणि यकृत प्रत्यारोपण युनिट उभारण्यासाठी त्यांनी मागील दीड वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्ती मिळावी यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे अर्ज सादर केला आहे. वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या कार्यालयात हा अर्ज सादर पोहोचला असल्याची माहिती आहे. अधिष्ठाता डॉ.मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्ती अर्ज सादर केल्याची वार्ता मेडिकलसह वैद्यकीय क्षेत्रात पसरल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

डॉ. मित्रा यांनी ३० सप्टेंबरला स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज वैद्यकीय संचालक कार्यालयाकडे सादर केला आहे. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी मेडिकलच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख असलेले डॉ. मित्रा यांनी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडून अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला होता. यानंतर सहा महिने प्रभारावर त्यांनी काम बघितले. डॉ. मित्रा यांच्याकडे ११ सप्टेंबर २०१९ रोजी स्थायी स्वरूपातील अधिष्ठातापद आले. यानंतर अवघ्या दीड वर्षांच्या कालखंडानंतर डॉ. मित्रा यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज सादर केला. त्यांनी हा निर्णय घेण्याचे कारण काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील ४० वर्षांपासून ते मेडिकलमध्ये सेवा देत आहेत. अस्थिरोग विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांना अधिष्ठाता पदावर बढती मिळाली. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ आणि गुडघा, हिप प्रत्यारोपात डॉ. मित्रा यांचा हातखंडा आहे. त्यांनी सिकलसेलबाधितांवर मोठ्या प्रमाणात हिप रिप्लेसमेंट केले आहे. हृदय प्रत्यारोपण युनिटच्या उभारण्यासोबतच फुप्फुस आणि यकृत प्रत्यारोपण युनिट उभारण्यासाठी त्यांनी मागील दीड वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यामुळेच कर्मचारी आणि सहकारी अधिकारी मेडिकलमध्ये डॉ. मित्रा यांची गरज आहे, असे खासगीत बोलत आहेत. 

डॉ. मित्रा करतात शस्त्रक्रिया 
अधिष्ठातापदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सहसा कुणी रुग्ण तपासत नाही, असा अनुभव आहे. परंतु डॉ. मित्रा यांनी अधिष्ठातापदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अस्थिरोग विभागाच्या शस्त्रक्रियागारात ते रोज जातात. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे रुग्णांमध्ये डॉ. मित्रा लोकप्रिय आहेत. डॉ. मित्रा यांच्या कार्यकाळात मेडिकल व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक प्रकल्प येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा नागपुरात प्रादुर्भाव झाल्यावर ट्रॉमा केयर सेंटरचे अद्ययावत कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले. मध्य भारतात सर्वाधिक कोरोनाबाधितांवर उपचार मेडिकलमध्ये होत आहेत. कोरोनावरील उपचाराचे योग्य मॉडेल त्यांनी उभारले असून त्या नियोजनातून काम सुरू आहे. डॉ. मित्रा यांना आरोग्याच्या कारणामुळे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला असल्याचे सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dean Dr. Sajal Mitra Application for Voluntary Vetirement