उच्चभ्रूंच्या वस्तीतून येत होती तीव्र दुर्गंधी; पोलिस पोचले तेव्हा दिसले हे...

शुक्रवार, 12 जून 2020

या घराच्या शेजारी राहणारे डॉक्‍टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीव्र दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी लागलीच महापालिका आणि धंतोली पोलिसांना सूचना दिली. 

नागपूर : धंतोलीसारख्या भरगच्च आणि उच्चभ्रूंच्या वस्तीतून तीव्र दुर्गंध येत होती. याचा त्रास जाणवू लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने तपासणी केली असता एका पडक्‍या घरातून दुर्गंध येत असल्याचे निष्पन्न झाले. जवळ जाऊन पाहिले असता या घटनेचे बिंग फुटले. 

मृताची ओळख पटू शकली नाही. तो 35 ते 40 वर्षे वयोगटातील आहे. धंतोलीतील एचडीएफसी बॅंकेच्या ओळीत असणारे हे पडके घर विवेक कुकरेजा यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. सध्या तिथे कुणी राहत नाही. या घराच्या शेजारी राहणारे डॉक्‍टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीव्र दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी लागलीच महापालिका आणि धंतोली पोलिसांना सूचना दिली. 

तातडीने मनपा आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल घाले. दुर्गंधीचा शोध घेत पथक पडक्‍या घराच्या मागील भागात पोहोचले. उघड्या खोलीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णत: कुजला असल्याने ओळख पटविणेही कठीण आहे. घटनास्थळ भर वस्तीत असून सतत वर्दळ असते. शेजाऱ्यांनाही नजीकच्या काळात कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्या नाही. 

यामुळे इतरत्र खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या घरात आणून टाकला असल्याची चर्चा परिसरात जोरावर आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात बाहेरील युवक सतत येत असल्याची माहिती पुढे आली आहे. बाहेरून येणाऱ्यांसोबतच स्थानिक सुरक्षारक्षक याच भागात रात्री गांजा व दारू पीत बसलेले असल्याचे सांगितले जाते. बाहेरून येणाऱ्यांमध्ये गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांचा समावेश असल्याचीही चर्चा आहे. 

मृताच्या हातात रबरी ग्लोज 
मृताच्या डाव्या हाताच्या मनगटाला काळा धागा बांधलेला असून हातात रबरी ग्लोज आहे. अंगात पाढऱ्या रंगाचे फूल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची पॅंट आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर बरीच रुग्णालये आहेत. त्यातच मृताच्या हातातही रबरी ग्लोज असल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

हेही वाचा : अस्वलीने शिकाऱ्यांना ठार मारून घेतला बदला

विशेष पथकाकडून मृतदेहाची हाताळणी 
कोरोनाच्या संसर्गाची भीती असल्याने अनोळखी मृतदेहाची लांबूनच तपासणी करणे बंधनकारक आहे. यामुळे पोलिसांना वरवरच तपासणी करता आली. घटनास्थळी पंचनाम्यानंतर विशषे पथकाच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे प्रथम कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल यायचा असल्याने शवविच्छेदनही होऊ शकले नाही. शवविच्छेदन अहवालातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.