एका एका खाटेसाठी जातोय कोरोना रुग्णांचा जीव; काँग्रेसच्या आमदाराने उपमुख्यमंत्री अजित पवारांना केली ही मागणी

राजेश चरपे
Thursday, 10 September 2020

नागपूर महापालिकेतर्फे मोठा गाजावाजा करून राधास्वामी सत्संग मंडळाच्या सहकार्याने पाच हजार खाटांचे कोविड केअर सेंटरची उभारणी केल्याचा दावा केला होता. मात्र, अद्याप याठिकाणी एकही बेड रुग्णांना उपलब्ध उपलब्ध झाला नाही.

नागपूर : मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ कोरोना रुग्ण आणि मृतांची मोठी संख्या नागपूरमध्ये आहे. संक्रमण रोखण्यासाठी तातडीने जंबो इस्पितळ सुरू करा, अशी मागणी आमदार तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नागपूरमध्ये ११ हजार ४७७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. याच काळात ३२० नागरिकांचा मृत्यू झाला. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत संक्रमित रुग्णांचा आकडा सात पटीने वाढला आहे.

अधिक माहितीसाठी - Big News : एनसीबीच्या चौकशीत रिया ढसा ढसा रडली; ड्रग्सबाबत केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर

नागपुरात मेयो, मेडिकल व एम्स या तिन्ही शासकीय रुग्णालयातील खाटा पूर्णपणे भरल्या आहेत. आता येथे खाटाच उपलब्ध नाहीत. खाजगी रुग्णालयांची देखील हीच स्थिती आहे. याशिवाय सर्वसामान्य माणूस हा खाजगी रुग्णालयांचे लाखो रुपये बिल भरण्यास सर्वथा असमर्थ आहे.

नागपूर महापालिकेतर्फे मोठा गाजावाजा करून राधास्वामी सत्संग मंडळाच्या सहकार्याने पाच हजार खाटांचे कोविड केअर सेंटरची उभारणी केल्याचा दावा केला होता. मात्र, अद्याप याठिकाणी एकही बेड रुग्णांना उपलब्ध उपलब्ध झाला नाही.

महत्त्वाची बातमी - संतापजनक प्रकार! शेत दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक एक पसार 

मनपाचे ५ रुग्णालये मिळून ४५० खाटांची व्यवस्था असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात एकाही रुग्णाला येथे भरती करण्यात आलेले नाही. या रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, कर्मचारी नाहीत. तर दुसरीकडे एका खाटेसाठी कोरोना रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे तातडीने जंबो इस्पितळ उभारण्यात यावे, अशी विनंती विकास ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to start Jumbo Hospital in Nagpur