सावधान! उपराजधानीला आता डेंगी आणि मलेरियाचा डंख; मोकळे भूखंड बनले डासांचे ‘हॉटस्पॉट' 

dengue and malaria are increasing in nagpur
dengue and malaria are increasing in nagpur

नागपूर ः एकीकडे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचा दिलासा असताना नागपूरकरांना आता डेंगी अन् मलेरियाशी दोन हात करावे लागणार आहेत. विडच्या नियंत्रणात सारी यंत्रणा लागल्याने डासांवर नियंत्रणाच्या उपाययोजना कागदावरच राहिल्या. शहरातील अनेक मोकळ्या भूखंडांवर पाणी साचले तर काही भूखंडांवर झुडपं तयार झाली आहेत.परिणामी शहरातील मोकळे भूखंड मलेरिया, डेंगीचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या सप्टेंबरमध्ये शहरात डेंगीचे १८ रुग्ण आढळून आले. परंतु त्यावर उपाययोजनांकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ६६ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाल्याची नोंदही महापालिकेने केली. डेंगीचा प्रकोप वाढत असतानाच बेलतरोडी मार्गावरील रमानगरातील मोकळ्या भूखंडांवर गेल्या सहा महिन्यांपासून गुडघाभर साचलेल्या पाण्यावरून मलेरिया वाढण्याची चिन्हे आहेत. 

रमानगरातील गल्ली क्रमांक तीनमधील या भूखंडांच्या बाजूला असलेली सिवेज लाईनला गळती लागली असून, घाण पाणी भूखंडांवर जमा होत आहे. सध्या गुडघाभर पाणी जमा झाले आहे. या प्लॉटजवळच अनेक लहान मुले खेळत असतात. या परिसरातील नागरिकांनी नगरसेवक संदीप गवई यांना अनेकदा फोनवरून माहिती दिली. परंतु गवई यांना अद्याप परिसरात येऊन पाहण्याचीही वेळ मिळाली नसल्याचे या परिसरातील नागरिकांनी नमूद केले. सांगितले.

रमानगरातील या मोकळ्या भूखंडाप्रमाणेच शहरातील इतर भूखंडांचीही स्थिती आहे. अनेक भूखंडांवर झुडपं वाढली आहेत. मोकळ्या भूखंडधारकांचा शोध लावण्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे मोकळे भूखंड मलेरिया, डेंगीचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य सभापतींच्या प्रभागातच डेंगी

महापालिकेचे आरोग्य समिती सभापती विक्की कुकरेजा यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये डेंगीचा एक रुग्ण आढळून आला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये चार, प्रभाग क्रमांक ७ मध्ये दोन, धरमपेठ झोनमध्ये एक रुग्ण आढळला. प्रेमनगरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ऑगस्टमध्ये १६ तर जुलैमध्ये १० डेंगीचे रुग्ण आढळून आले होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com