दुर्दैव..व्यक्ती बघून विलगीकरणाचा निर्णय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

रुग्णाच्या थेट संपर्कात न येता रुग्ण औषध विक्रेत्याच्या आणि औषध विक्रेता दुसऱ्या डॉक्‍टरच्या संपर्कात आला. त्या डॉक्‍टरला मात्र सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात आले.

नागपूर : हिंगणा मार्गावरील गजाननगरमध्ये एक कोरोनाबाधित आढळल्यानंतर संपर्कातील साऱ्यांनाच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची गरज आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रोटोकॉल पाळला जात आहे. मात्र, हिंगणा मार्गावरील आढळलेला रुग्ण ज्या डॉक्‍टरांच्या प्रत्यक्ष संपर्कात आला, त्याला घरीही विलगीकरण केले नाही.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

मात्र, दुसरा एक डॉक्‍टर प्रत्यक्ष संपर्कात न येता, दुसऱ्यांकडून संपर्कात आल्याची शक्‍यता आहे, यानंतरही त्या डॉक्‍टरला 14 दिवस रविभवनात विलगीकरण करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती आहे. अशाप्रकारे प्रोटोकॉलला हरताळ फासून पक्षपाती धोरण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

एक जून रोजी हिंगणा मार्गावरील राजीवनगर रोडवर असलेल्या क्‍लिनिकमध्ये एक व्यक्ती एका डॉक्‍टरकडे तपासणीसाठी आला. त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आली. तपासणी केली असता, 3 जून रोजी तो कोरोनाबाधित आढळला. यामुळे संपर्कातील आलेल्या सर्वच डॉक्‍टरांचे विलगीकरण करण्याची गरज होती. त्यांना विलगीकरण करण्यात आले नाही.

मात्र, रुग्णाच्या थेट संपर्कात न येता रुग्ण औषध विक्रेत्याच्या आणि औषध विक्रेता दुसऱ्या डॉक्‍टरच्या संपर्कात आला. त्या डॉक्‍टरला मात्र सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात आले. दोन डॉक्‍टरांसाठी विलगीकरणाचे वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. यांचेही क्‍लिनिक आयसी रोडवर आहे. प्रत्यक्ष रुग्णाला तपासणाऱ्या डॉक्‍टरांना विलगीकरणात टाकण्यात का आले नाही, असा प्रश्‍न पुढे येतो. 

त्यांचे रुग्णालय सुरू... 
एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम लावला, तर गैरसमज होण्याची शक्‍यता अधिक आहे. विलगीकरणात रवानगी केल्याने त्यांचे क्‍लिनिक मात्र बंद आहे. मात्र, थेट रुग्णाला तपासूनही त्यांना विलगीकरणात टाकण्यात आले नाही, असा वेगवेगळा न्याय मिळत असल्याबद्दल शंका व्यक्त करण्यात आली आहे. 

कोणाबाबतही पक्षपाती धोरण राबवत नाही. तपासताना पीपीई किट व इतर साहित्यांचा योग्य वापर केला असेल. यामुळे त्यांचे विलगीकरण केले नसेल. हिंगणा विभागात तीन ठिकाणचे तीन रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात पाहणी केल्यानंतरच अधिक सांगता येईल. 
-डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: different rule for different people about isolating