तुकाराम मुंढेंना असा बसला 'स्मार्ट' धक्का...जाणून घ्या प्रकरण

Directors oppose the 'CEO' post of Tukaram mundhe
Directors oppose the 'CEO' post of Tukaram mundhe

नागपूर : नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक आज महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. या बैठकीत चेअरमन प्रवीण परदेसी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला.

बैठकीत संचालक व महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, सेनेच्या नगरसेविका मंगला गवरे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नासुप्र सभापती शीतल उगले, सीए अनिरुद्ध शेनवाई, सीए जयदीप शहा उपस्थित होते. केंद्र सरकारचे दीपक कोचर यांनीही ऑनलाईन भाग घेतला.

बैठकीनंतर महापौर जोशी यांनी पत्रकारपरिषदेत संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती दिली. आयुक्त मुंढे यांनी मनपा आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जोशी म्हणाले. या प्रस्तावाला विरोध करीत मतदानाची मागणी केली. मात्र, चेअरमन प्रवीण परदेसी यांनी मतदानाऐवजी प्रत्येकाचे मत जाणून घेण्याचे ठरविले. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, नासुप्र सभापतींचे मत जाणून घेतले. या तिघांनीही स्मार्ट सिटीच्या "एचआर' धोरणानुसार निर्णय घेण्याचे मत व्यक्त केल्याचे संदीप जोशी म्हणाले.

माझ्यासह संदीप जाधव, पिंटू झलके, तानाजी वनवे, वैशाली नारनवरे "एचआर' धोरणानुसार नवीन पूर्णवेळ सीईओंची नियुक्ती होईस्तोवर डेप्युटी सीईओकडे सीईओपदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी केली. यावरून सर्वानुमते डेप्युटी सीईओ महेश मोरोणे यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. वित्त व लेखा अधिकारीपदासाठी जाहिरात काढण्याचा निर्णय झाल्याचेही महापौर म्हणाले. या बैठकीत आयुक्तांच्या संचालकपदाला मान्यता देण्यात आली. 

आयुक्त सीईओ नव्हतेच 
आतापर्यत आयुक्त सीईओपदी असल्याचे सांगत होते. सीईओपदाचा मुद्दा संचालक मंडळापुढे मांडण्याबाबत तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाकडे लक्ष ठेवण्याबाबत सांगितले होते असे चेअरमन प्रवीण परदेसी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयुक्त सीईओ नव्हतेच, हे स्पष्ट झाल्याचे महापौर म्हणाले. 

खोटारडेपणा उघड ः महापौर 
गेल्या महिनाभरापासून सीईओपदाबाबत आयुक्त खोटे बोलत आहेत. आज संचालक मंडळाच्या बैठकीत आयुक्त खोटारडे असल्याचे उघड झाल्याचा आरोप महापौर जोशी यांनी केला. सीईओपदी नसताना केलेल्या व्यवहाराच्या चौकशीसंबंधी महाधिवक्‍त्यांकडून कायदेशीर सल्ला घेऊन संचालकांपुढे चर्चा करू, असे परदेसी यांनी म्हटल्याचे महापौरांनी सांगितले. 

चेअरमनच्या निर्देशानुसारच घेतले निर्णय ः आयुक्त 
यापूर्वी जे मी सांगितले, त्यावर ठाम आहे. स्मार्ट सिटी चेअरमन यांनी दिलेल्या निर्देशानुसारच मी काम केले, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. सीईओपदासाठी इच्छुक नाही. परंतु मी जे निर्णय घेतले, त्याबाबत आताच का बोलले जात आहे. गेल्या पाच महिन्यात निर्णय घेताना कुणीच का आक्षेप घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. 

कायद्याचा विजय ः दटके 
खोट्या गोष्टी वरवर आकर्षक वाटतात, विजय मात्र नेहमी सत्याचाच होतो. आयुक्त मुंढे सीईओ नाहीत, ते खोटं बोलत आहेत, हे आज झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत स्पष्ट झाले. मुंढे यांनी या पुढे संयम आणि समन्वयाने वागावे. शहराच्या विकासासाठी त्यांनी कामाची पद्धत बदलावी, असे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले. 

मोरोणे यांच्याकडे कार्यभार

स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्तीचा प्रस्ताव स्वतःच मांडणारे आयुक्त तुकाराम मुंढेऐवजी डेप्युटी सीईओ महेश मोरोणे यांच्याकडे कार्यभार देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सीईओपदी नियुक्ती झाल्याचा दावा करीत असलेल्या आयुक्तांना आज स्मार्ट सिटी संचालकांच्या बैठकीत जोरदार धक्का बसला. आयुक्तांचे सीईओपद नियमबाह्य असल्याचे सांगणाऱ्या महापौर संदीप जोशी यांची यानिमित्त सरशी झाल्याची चर्चा रंगली. 

(संपादन ः प्रशांत राॅय़)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com