राऊत म्हणाले नागपूर मेट्रोचे श्रेय आमचे, मुख्यमंत्री म्हणाले जाऊ द्या ना...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील मेट्रोचा लोकार्पण समारंभ आज सुभाषनगर मेट्रो स्टेशनवर पार पडला. मेट्रोच्या लोकार्पणासह हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी श्रेय लाटण्यासाठी केलेल्या चढाओढीसाठीही संस्मरणीय ठरला.

नागपूर : मला कुठल्याही कामाचे श्रेय लाटायचे नाही. मेट्रोच्या यशासाठी ज्यांनी प्रयत्न केले, परिश्रम घेतले, त्या सर्वांना या यशाचे श्रेय देतो, असे नमूद करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर बसलेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना जोरदार चपराक दिली. आम्हाला केवळ जनतेचे आशीर्वाद हवे, अशी पुस्ती जोडत त्यांनी मंत्र्यांना टोलाही हाणला.
महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील मेट्रोचा लोकार्पण समारंभ आज सुभाषनगर मेट्रो स्टेशनवर पार पडला. मेट्रोच्या लोकार्पणासह हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी श्रेय लाटण्यासाठी केलेल्या चढाओढीसाठीही संस्मरणीय ठरला. मेट्रोच्या लोकार्पण समारंभात सर्वप्रथम पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना भाषणाची संधी मिळाली. त्यांनी शहराचा विकास व राजकारण यांचा ताळमेळ राखत नागपुरातील विविध पक्षांच्या विचारधारेचे लोक एकत्र येत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला गडकरींनी दाखविल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी नागपूर मेट्रोची संकल्पना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची असल्याचे सांगितले. त्यानंतर ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नागपूरला जागतिक दर्जाचे शहर केल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा - अरे भाऊ तुकाराम मुंढे आहेत ते! जरा कडक सॅल्यूट मार...

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने 2014 मध्ये मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिल्याने आज शहरात मेट्रो धावत असल्याचे नमूद केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही विलासराव देशमुख यांनी मेट्रो प्रकल्पासाठी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला, त्यानंतर आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळात नागपूर व पुणे मेट्रोला मान्यता दिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर देशमुख यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला गती दिल्याने वेळेत प्रकल्प पूर्ण झाल्याचे नमूद करीत भाजपलाही श्रेय दिले. नागपूर शहराला बदलण्याची सुरुवात विलासराव देशमुखांनी केली, त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून शहर विकास झाल्याचे देशमुख म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनीही ऑनलाइन भाषणातून मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांनाच यशाचे श्रेय असल्याचे नमूद करीत या मंत्र्यांना चपराक लावली.

केंद्रीयमंत्री गडकरींचाही टोला
तिन्ही मंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोसाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. परंतु, यापैकी कुणीही माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांचे नाव घेतले नाही. "मेट्रोसाठी विलास मुत्तेमवार यांनाही श्रेय द्या, त्यांनीही नागपूर मेट्रोची मागणी लावून धरली होती', असे नमूद करीत गडकरींनी मंत्र्यांना टोला लगावला. मिहानमध्ये 25 हजार तरुणांना रोजगार दिला असून त्यांची नावासकट यादी असल्याचे स्पष्ट करीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या रोजगारनिर्मिती न झाल्याच्या आरोपाची गडकरींनी हवा काढली.

फडणवीसांनी केली सुरुवात
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांनी नागपूर शहराला मेट्रो उपलब्ध करून दिल्याचे नमूद करीत श्रेय लाटण्याची संधी सोडली नाही. या प्रकल्पात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घातले, असेही सांगितले. यानंतर महाआघाडी सरकारच्या व्यासपीठावरील तिन्ही मंत्र्यांत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या तत्कालीन सरकारने मेट्रो प्रकल्पाचा पाया रचल्याचे सांगण्याची स्पर्धा रंगली. फडणवीस यांनी यावेळी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी आला असून मुख्यमंत्री व नगरविकासमंत्र्यांनी मान्यता द्यावी, अशी विनंती केली.
मेट्रोच्या जाहिरातीत नाव नसल्याने मंत्र्यांची नाराजी
हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबडी मेट्रो प्रवास आजपासून सुरू झाला. मेट्रोच्या लोकार्पणाच्या प्रसिद्धीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीत नाव नसल्याने मंत्र्यांनी महामेट्रो प्रशासनावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
महामेट्रोच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रोचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. मेट्रोच्या लोकार्पणासंबंधी महामेट्रो सर्व वृत्तपत्रांना जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीत मुख्यमंत्री ठाकरे, केंद्रीयमंत्री गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री पुरी यांची नावे आहेत. मात्र, राज्य मंत्रिमंडळात शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या एकाही मंत्र्यांचे नाव नाही. यावर कार्यक्रमादरम्यान भाषणातून ऊर्जामंत्री व पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. यापुढे शहरातील मंत्र्यांच्या नावाचा मेट्रोच्या कुठल्याही कार्यक्रमाबाबत समावेश करावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तमानपत्रातून देण्यात आलेल्या जाहिरातीत आज जी चूक झाली, ती भविष्यात होऊ नये, असा इशारा दिला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: displeasure of ministers in metro inauguration program