विकासकामांवरून नव्हे निव्वळ भूमिपूजनावरून झाला वाद, माजी आमदार पुत्रावर गुन्हा

भिवापूरः ठाणेदारांशी चर्चा करताना आमदार राजू पारवे व काँग्रेसचे कार्यकर्ते.
भिवापूरः ठाणेदारांशी चर्चा करताना आमदार राजू पारवे व काँग्रेसचे कार्यकर्ते.

भिवापूर (जि.नागपूर) : विकासकामांचे यापूर्वी भूमिपूजन झालेले असताना श्रेय लाटण्यासाठी पुन्हा नव्याने त्याच कामांचे भूमिपूजन करण्यात आल्याचा आरोप करीत भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भूमिपूजनस्थळी निदर्शने करीत  माहिती फलकांची नासधूस केली. यासंबंधात नगर पंचायत अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारावर पोलिसांनी शनिवारी माजी आमदार पुत्रासह शहर भाजपच्या काही पदाधिकाऱ्याविरुद्ध  गुन्हा नोंदविला.

फलक उपटून पायदळी तुडवले
नगरपंचायततर्फे शुक्रवारी शहराच्या विविध वार्डातील विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार राजू पारवे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नगराध्यक्षा किरण नागरीकर, उपाध्यक्षा वर्षा ठाकरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिलीप गुप्ता आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.  दरम्यान केंद्रीय वाचनालय इमारत व शिवाजी ले आऊट येथील रस्ता बांधकामाचे २०१८ मध्ये तत्कालीन आमदार सुधीर पारवे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडल्याचा आरोप स्थानिक भाजपकडून करण्यात आला. श्रेय लाटण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने पुन्हा नव्याने या बांधकामाचे भूमिपूजन केल्याचे सांगत न.पं.च्या या कृत्याचा निषेध नोंदविला.  काही अतिउत्साही भाजप कार्यकर्त्यांनी माजी आमदार सुधीर पारवे यांचे पुत्र रोहीत पारवे यांच्या नेतृत्वात भूमिपुजन स्थळी लावलेले माहिती फलक उपडून ते पायदळी तुडवलेत.
.
अधिक वाचाः याला म्हणतात आत्मविश्वास! फेरमूल्यांकनात जुळ्यांचे गुण ‘सेम टू सेम'; दहावीच्या निकालात दुसऱ्या स्थानावर
 

काही काळ तणावाची स्थिती
 या घटनेवरुन शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नगराध्यक्ष किरण नागरीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी तर मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी शनिवारी वरील घटनेची तक्रार पोलिसांत दाखल केली. शासकीय मालमत्तेची नासधूस केल्याच्या आरोपाखाली शनिवारी पोलिसांनी भाजपचे शहर अध्यक्ष विवेक ठाकरे, माजी अध्यक्ष आनंद गुप्ता, सुधीर पारवे यांचे पुत्र रोहीत पारवे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रशेखर रेवतकर करीत आहेत.

तात्काळ कारवाई करा : युवक काँग्रेसची मागणी
 विधानसभा व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या पराजयाने शुद्ध गमावलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून शहराच्या विकास कामात जाणीवपूर्वक विघ्न उत्पन्न केले जात आहे. शुक्रवारी घडलेली घटना त्याचेच उदाहरण आहे. अशा विघ्नसंतोषी भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध ताबडतोब  कारवाई करण्याची मागणी शनिवारी एका निवेदनाद्वारे उमरेड विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील शंभरच्यावर प्रमुख कार्यकर्त्यांनी ठाणेदार महेश भोरटेकर यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन त्यांना सोपविले.

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com