जिल्हाप्रमुख झाले सह संपर्कप्रमुख; शिवसेनेत असंतोष
माजी उपमहापौर शेखर सावरबांधे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी पूर्व आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आहेत. पूर्व नागपूरमधून शिवसेनेचे उमेदवार असताना माजी मंत्री व तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला होता.
नागपूर : माजी जिल्हाप्रमुखांना सन्मानाचे स्थान देण्याऐवजी सह संपर्कप्रमुख करून डिमोशन केल्याने शिवसेनेत कार्यकारिणीवरून असंतोष उफाळून आला आहे. शिवाय कार्यकारिणीत दक्षिण आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचीच अधिक काळजी घेण्यात आल्याने या दोन मतदारसंघावर सेना दावा करण्याची शक्यता आहे.
माजी उपमहापौर शेखर सावरबांधे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी पूर्व आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आहेत. पूर्व नागपूरमधून शिवसेनेचे उमेदवार असताना माजी मंत्री व तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला होता.
बसपच्या उमेदवाराने त्यांचा विजयाचा घास हिरावून घेतला. त्यानंतर दक्षिणेतून माघार घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या घरी आले होते. सतीश हरडे हे नागपूरचे जिल्हाप्रमुख होते. गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. मध्य नागपूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली आहे. सह संपर्कप्रमुख करून त्यांचीही पदावनती करण्यात आली आहे.
दक्षिणेचे राजकारण
शेखर सावरबांधे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे दावेदार ठरू शकतात. त्यामुळे त्यांना दक्षिणऐवजी पूर्व आणि पश्चिम विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण नागपूरमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. याच भागात त्यांचे कार्य व संपर्कही आहे. ते दक्षिण अधिक बळकट करू शकले असते. नवनियुक्त महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे हेही दक्षिण नागपूरमध्ये राहतात. त्यांचा याच मतदारसंघावर दावा आहे. त्यांनी स्वबळावर येथून विधानसभेची निवडणूक लढली होती. भविष्यात दक्षिणेत दावेदार वाढू नये याचीही खबरदारी घेण्यात आली असल्याचे समजते. येथील दावेदार माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना मात्र दक्षिणसह मध्यच्याही संपर्कात ठेवले आहे. अनेक दिवसांपासून कोणाच्याच संपर्कात नसलेले विशाल बरबटे यांना उत्तर व पूर्वचे, किशोर पराते यांना पश्चिम व मध्य, मंगेश काशीकर यांना दक्षिण-पश्चिम व दक्षिणचे महानगर संघटक करण्यात आले आहे.
संपादन : अतुल मांगे