शाब्बास ! नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना ७७ कोटी ३३ लाख रुपयांचे पिककर्ज वाटप

file
file

जलालखेडा (जि.नागपूर) : कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना बळीराजा मात्र काळ्या आईची ओटी भरण्यासाठी तयारीला लागला असल्याचे चित्र ग्रामीण भागांमध्ये पहायला मिळत आहे. बँकांनी त्यांच्या या प्रयत्नाला हातभार लावण्याचे धोरण स्वीकारले असून कर्जरुपाने मदत केली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी मंगळवारपर्यंत ७७.३३ कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे. यात राष्ट्रीयकृत बँकेतून १०२.४३ टक्के तर जिल्हा बँकेतून फक्त २१.१२ टक्के असे लक्षांकाच्या ८३.०९ टक्के पिककर्ज वितरीत करण्यात आहे.

उद्दिष्टाच्या पुढे देखील जाऊन कर्जवाटप
नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली आहे. अशात त्यांना शेतीतील पिकांसाठी आवश्यक खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्या अपेक्षा बँकेच्या पिककर्जावर टिकून होत्या. यावर्षी जिल्हा बँक जरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी नसली तरी राष्ट्रीयकृत बँकेच्या काही जर शाखा सोडल्या तर अनेक शाखांनी त्यांनी दिलेल्या उद्दिष्टाकडे वाटचालच नव्हे तर उद्दिष्टाच्या पुढे देखील जाऊन कर्जवाटप केल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला व तो जोरात शेतीच्या कामात लागला आहे. यावर्षी पाऊस अनियमित पडत असल्याने व नव्याने पिकाला आणलेल्या रोगांमुळे एकीकडे शेतकरी चिंतेत असला तरी बँकेने त्याला कर्जवाटप केल्यामुळे त्याला सावकाराच्या दारासमोर हात पसरावे लागत नसल्याचे चित्र असले तरी मात्र अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे कर्ज मिळत नसल्यामुळे त्यांना सावकार जवळ गेल्याशिवाय पर्याय दिसत नाही.
अधिक वाचाः या अशा काळात, रोग म्हणे, कपाशीला ‘मर’!, काय आहे प्रकार....
 

मंगळवारपर्यंत ७७.३३ कोटींचे पीककर्ज वाटप   
अवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवून दिलासा दिला आहे. पण अद्याप ही अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. शासनाने कर्जमाफी झालेल्यांची कर्जाची रक्कम शासनाला नवे टाकून शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्याचे आदेश दिले असले तरी मात्र याला बँकांकडून केराची टोपली दाखविली जात आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तरी पण नरखेड तालुक्यात यावर्षी पिककर्ज वाटपाचे प्रमाण जास्त आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा ७७.३३ कोटी रुपयांचे पिक कर्ज विविध बॅकामार्फत वाटप करण्यात आले आहे.  सन २०२०-२१  या वर्षातील खरीप हंगामासाठी तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या १३ व जिल्हा बँकेच्या ७ अशा २० शाखेतून ९३.०७ कोटी रुपयांचे पिक कर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या १३ शाखांमधून ७०९३.१०  लक्ष रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. तर काल ( ता.१४) पर्यंत ह्या बँकांनी ६६८९ शेतकऱ्यांना ७२६५. ४५ रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे, याची टक्केवारी १०२. ४३ टक्के आहे.

अशी आहे  कर्जाची टक्केवारी
 नरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रने आघाडी घेत ४७७ शेतकऱ्यांना ५६५.१७ लक्ष रुपयांचे कर्जवाटप करून १७३.९९ टक्के वाटप केले आहे. तर भारसिंगी येथील बँक ऑफ इंडियाने कमालीची आघाडी घेत ८५० शेतकऱ्यांना १२०९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले असून याची टक्केवारी १६३.५३ टक्के आहे. तर सर्वात कमी पिककर्ज वाटप नरखेड येथील युनियन बँक ऑफ इंडियाची आहे. या बँकेने फक्त ५६.६६ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नरखेड तालुक्यात सात शाखा असून त्यांना असलेल्या २२१३.८० लाख रुपये उद्दिष्टाच्या फक्त ४६७.५३ लक्ष रुपयेच कर्ज वाटप केले आहे व याची टक्केवारी २१.१२ टक्केच आहे. जिल्हा बँकेच्या पीछेहाटमुळे अनेक शेतकऱ्यांना पिककर्ज मिळत नसल्याचे ही चित्र आहे. काल ( ता. १४) पर्यंत सर्वच बँकेमार्फत ७२३३ शेतकऱ्यांना ७७३२.९८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले असून याची टक्केवारी ८३.०९ आहे. हे कर्जवाटप समाधानकारक असले तरी मात्र जेव्हा शेतकऱ्यांना पैशाची खर्च गरज होती, तेव्हा मात्र मिळाले नाही व आता कुठे शेतकऱ्यांना ते मिळत आहे.  

पीककर्जाचे वाटप करण्याच्या सूचना बँकांना दिल्या
यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत पीककर्जाच्या वाटपाची टक्केवारी जास्त आहे. काही बँक सोडल्या तर अनेकांनी त्यांच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. इतकेच नव्हे तर तालुक्यातील काही बँकांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टे गाठून जास्त पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेजवळ निधी नसल्यामुळे त्यांची टक्केवारी कमी आहे. पण ही कर्ज वाटप प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असल्यामुळे टक्केवारी वाढणार आहे. तसेच ज्यांचे नाव कर्जमाफीत आले आहे व त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसली तरी शासनाच्या आदेशप्रमाणे शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहे.
श्रीमती बालपांडे
प्रभारी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका नरखेड

शेतकऱ्यांना त्रास झाला नाही व होणारही नाही
शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी दिवस रात्र काम करून कागदपत्रांची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता कर्ज वाटप करण्यात आले आहे. ५५२.५० लख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टानंतर ही ८५० शेतकऱ्यांना १२०९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे व याची टक्केवारी १६३.५३ टक्के आहे. तसेच आता ही कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात येत आहे व पुढे ते चालूच राहणार आहे. शेतकऱ्यांना त्रास झाला नाही व होणार देखील नाही याची खबरदारी बँक घेत आहे.
मनीष गजभिये
शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, भारसिंगी

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com