नर्सिंग सहसंचालक पदावर डॉक्टरचे अतिक्रमण

केवल जीवनतारे
Tuesday, 27 October 2020

राज्यात राज्य शुश्रूषा सेवा अधीक्षक (मुंबई) हे पद निर्माण करण्यात आले. मात्र मागील पंचेचाळीस वर्षांमध्ये एकदादेखील परिचर्या व्यवसायात कार्यरत असलेल्या व्यक्तीला सहसंचालक पदाचा मान मिळाला नसल्याची खंत विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी व्यक्त केली.

नागपूर : परिचारिकांच्या अडचणी तसेच नियोजन करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने एक सहसंचालक पदाची निर्मिती केली होती. परंतु मागील पंचेचाळीस वर्षांमध्ये नर्सिंग विभागातून एकही सहसंचालक दिला गेला नाही. तर नर्सिंग विभागाच्या सहसंचालक पदावर डॉक्टरच नेमण्यात येत होते. डॉक्टरांनी सहसंचालक पदावर अतिक्रमण केल्यामुळे परिचर्या व्यवसायात असंतोष आहे. 

राज्यात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यांचे नियोजन शिक्षण व संशोधन विभागाद्वारे होते. याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे २५ हजारांरापेक्षा अधिक परिचारिका कार्यरत आहेत.

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

राज्य शासनाशी संबंधित वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाशी संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय व नर्सिंग विभाग (परिचर्या) यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. यांमुळे या तिन्ही विभागांचे योग्य नियोजन व्हावे या हेतूने प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र सहसंचालक पदाची आस्थापना तयार करण्यात आली. १९७४ मध्ये नर्सिंग विभागासाठी सहसंचालक पद निर्माण करण्यात आल्यानंतर पदोन्नतीने किंवा शैक्षणिक पात्रतेचा निकष लावत या पदावर नर्सिंग विभागातील एखाद्या ज्येष्ठाची निवड होईल या आशेवर हा विभाग होता. याच वेळेस राज्यात राज्य शुश्रूषा सेवा अधीक्षक (मुंबई) हे पद निर्माण करण्यात आले. मात्र मागील पंचेचाळीस वर्षांमध्ये एकदादेखील परिचर्या व्यवसायात कार्यरत असलेल्या व्यक्तीला सहसंचालक पदाचा मान मिळाला नसल्याची खंत विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. 

नर्सिंग संचालनालयाच्या मागणीला खो 
परिचारिकांच्या शैक्षणिक, सेवाविषयक अडचणी, वेतनाशी संबंधित प्रश्‍न तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी राज्य स्तरावर संचालनालयाची निर्मिती व्हावी असा सूर आहे, परंतु याला खो देण्यात आला आहे. सध्या परिचारिकांना कोणीच वाली नाही. 

मागील पंचेचाळीस वर्षात या पदावर डॉक्टरांचीच नियुक्ती होत आहे. शासनाने हे पद परिचर्या व्यवसायातील व्यक्तीकडे देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल. एमपीएससीने किंवा सेवाज्येष्ठता लक्षात घेत हे पद भरावे. 
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्यसेवा कर्मचारी संघटना, नागपूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor's encroachment on the post of Joint Director of Nursing