कोरोनाचा धोका पत्करत लढले दंतचे योद्‌ध्ये, लॉकडाऊनमध्ये केल्या एवढ्या शस्त्रक्रिया

बुधवार, 24 जून 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे नागपूर शहरातील प्रत्येक कार्याला थांबा लागला होता. मात्र, नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयांतील या विभागात मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

नागपूर : कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना शहरातील दंतोपचार क्‍लिनिकपासून तर शासकीय दंत महाविद्यालयातील काही विभागील उपचारांवर अंकुश लावण्यात आला होतो. दंतोमुखोपचार करताना थेट कोरोनाचा धोका असल्यानेच हे उपचार थांबवले होते. परंतु, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील मुख शल्य चिकित्साशास्त्र विभागातील डॉक्‍टरांनी कोरोनाची जोखीम स्वीकारत तब्बल सुमारे सव्वाचारशे शस्त्रक्रिया करीत आपले कर्तव्य निभावले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे नागपूर शहरातील प्रत्येक कार्याला थांबा लागला होता. मात्र, नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयांतील या विभागात मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष असे की, राज्यातील मुंबई, औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयांपेक्षी नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राज्यात लॉकडाऊननंतर शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये अत्यावश्‍यक संवर्गातील बोटावर मोजण्याइतके रुग्ण वगळता इतर रुग्णांनी येणे बंदच केले होते.

चोरीच्या रकमेवरून झाला वाद, दारूच्या नशेत उचलला दगड आणि...

परंतु, नागपूरच्या रुग्णालयांत इतर रुग्णालयाच्या तुलनेत रुग्णांची संख्या बऱ्यापैकी होती. त्यामुळे या महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभागात तब्बल जवळपास एक हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. 256 रुग्णांवर दात काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय जबडा विस्कळीत झालेल्या 26 जणांवर, अपघातात जबडा कापल्या जाणाऱ्या 34 रुग्णांवर, हाणामारीमुळे दात व जबडा विस्कळीत झालेल्या 26 जणांवर, अपघातामुळे दात व जबडा विस्कळीत झालेल्या 52 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

याशिवाय संसर्ग व इतर आजारांच्या येथे 18 शस्त्रक्रिया झाल्या. नागपूरची संख्या सर्वाधिक असावी असे मुखशल्य चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अभय दातारकर म्हणाले. या रुग्णांवर उपचारादरम्यान सहयोगी प्राध्यापक डॉ. वर्षा मानेकर, डॉ. श्वेता कांबळे, डॉ. सुरेंद्र डावरे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. वंदना गडवे यांच्यासहित निवासी डॉक्‍टरांनी तसेच पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होऊ शकल्या, असे डॉ. दातारकर म्हणाले.

बघा : उमरेड शहरात कोरोनाचा प्रवेश; परिसर केले सील

दंतचिकित्सकांचे मौलिक योगदान

कोरोनाची आणिबाणी असताना शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्यासह सर्वच विभागातील दंत चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडले. दंत महाविद्यालयात दंतोपचार करतानाच दंत चिकित्सकांनी दोन महिने संशयितांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्याचे काम केले. यामुळे या काळात कोरोना योद्धा म्हणून दंत चिकित्सक आणि निवासी चिकित्सकांचे मोलाचे योगदान आहे.
डॉ. अभय दातारकर, विभागप्रमुख, मुख शल्य चिकित्साशास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर