का वाढतेय्‌ मोकट कुत्र्यांची संख्या? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

महापौर संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या उपक्रमात मोकाट कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आली. नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महापौरांकडे केली होती.

नागपूर : शहरात नसबंदीशिवाय 80 हजार कुत्रे मोकाट फिरत आहेत. या कुत्र्यांवर नसबंदी न केल्यास वर्षभरात तीन ते चारपटीने त्यांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. या कुत्र्यांवर नसबंदीसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी नमूद केले. 

महापौर संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या उपक्रमात मोकाट कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आली. नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महापौरांकडे केली होती. नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली होती. नागरिकांच्या मागणीनंतर मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांसोबत चर्चा करण्यात आल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. 

सिमेंट रस्त्यांची दोन कामे कमी करणार, परंतु मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नसबंदी कार्यक्रम प्राधान्याने राबविणार असल्याचे जोशी यांनी नमूद केले. शहरात 90 हजार कुत्री असून यातील दहा हजार कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु अद्याप 80 हजार मोकाट कुत्री नसबंदीशिवाय शहरात फिरत आहेत. 

क्लिक करा - व्वारे डॉक्‍टर! युवतीला केली शरीरसुखाची मागणी
 

सध्या नागपूरकरांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. त्या एकत्रित झाल्यानंतर त्याची श्‍वेतपत्रिका काढली जाईल. त्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे. महापौर झाल्यानंतर जोशी यांनी स्वागत समारंभ व हारतुरे न स्वीकारता थेट कामकाजाला सुरुवात केली आहे. अवघ्या दहा दिवसांच्या आत त्यांनी महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या तसेच सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या विविध उद्यानांमध्ये फिरून तसेच एनजीओसोबत ब्रेकफास्ट घेऊन जाणून घेतल्या.

याकरिता अनुभवी व ज्येष्ठ नगरसेवकांची समिती स्थापन केली. अधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले. सर्वांची माहिती एकत्रित करून श्‍वेतपत्रिका काढली जाणार आहे. अतिक्रमण, मोकाट कुत्रे, रस्त्यावर फिरणारे जनावरे, गोठे, स्वच्छता, महापालिकेची रुग्णालये, दवाखाने व शाळा याच समस्या प्राधान्याने सोडवण्यात याव्या असा भर बैठका व चर्चांमधून सर्वसामान्यांचा होता. 

प्रति श्‍वान 1 हजार रुपये दर

या कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी यापूर्वी महापालिकेने प्रति श्‍वान 800 रुपये दर निश्‍चित केला होता. परंतु विविध सामाजिक संस्थांनी यात वाढ करण्याची मागणी केली होती. आता प्रति श्‍वान 1 हजार रुपये दर निश्‍चित करण्यात आला. मुंबईसह विविध सामाजिक संस्थांनी कुत्र्यांच्या नसबंदी करण्यास तयारी दर्शविली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाले. कुत्र्यांवरील शस्त्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog is problem in nagpur city