नागपूर : शहरातील ज्येष्ठ शास्त्रीय गायक, संगीतगुरू तसेच संगीत समीक्षक डॉ. नारायण उपाख्य बाळ पुरोहित यांचे शनिवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, स्नुषा असा आप्तपरिवार आहे. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडले.
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. बाळ पुरोहित यांनी संगीताचे अध्ययन आणि अध्यापन यासाठी आपले आयुष्य समर्पित केले होते. उस्ताद अमीर खान साहेबांचा आणि त्यांच्या गायकीचा पुरोहित यांच्या गायकीवर मोठा प्रभाव होता. तसेच इतर घराण्यांच्या गायकीचासुद्धा गाढा अभ्यास होता.
त्यांनी गेल्या पन्नास वर्षांत मोठा शिष्यपरिवार घडविला. शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, उत्तम गायक आणि ग्रंथकर्ते म्हणून त्यांचे योगदान आहे. उत्कृष्ट गायक व लेखक म्हणून त्यांचे नाव देशभरात आदरपूर्वक घेतले जाते. ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती : मूलतत्त्वे आणि सिद्धांत’ या पुस्तकासह त्यांनी संगीतावर विपुल लेखन केले.
‘रसरंग’ या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आवर्जून गायल्या जातात. उस्ताद अमीर खान यांच्या इंदूर घराण्याचा त्यांच्या गायकीवर विशेष प्रभाव होता. सुप्रसिद्ध गायक पंडित उल्हास कशाळकर, साधना शिलेदार, डॉ. कल्याणी देशमुख, सुजाता व्यास आदी नामवंत शिष्य त्यांनी घडवले. प्रतिष्ठेच्या सूरमणी पुरस्काराने त्यांना गौरवले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.