कोरोनामुळे या वस्तूला मोठी मागणी

शनिवार, 30 मे 2020

मास्कचा वापर केल्याने संसर्ग किती टाळता येतो याविषयी तज्ज्ञ साशंक असले तरी, सध्या लोक दोन प्रकारचे मास्क वापरत आहेत.

नागपूर : कोरोनामुळे सारे जग सध्या मास्कमय झाल्याचे चित्र दिसत आहे. विविध रंगाचे आणि बनावटीचे मास्क तोंडावर बांधून लोकांचा वावर सुरू आहे. कोरोना व्हायरस मास्क भेदून तोंड व नाकाच्या वाटेने शरीरात घुसणार नाही अशा समजुतीत असल्याने, सध्या मास्कचे मार्केट जोरदार सुरू आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांची मास्क खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यात एन-95 या मास्कला सर्वाधिक मागणी आहे. शहरात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध असून जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत लाखो रुपयांच्या मास्कची विक्री झाली आहे. या आजाराला औषध नाही, लस नाही. मास्कशिवाय बाहेर पडू नका, मास्कशिवाय कार्यालयात येऊ नका अशी सक्ती सुरू झाल्याने, मास्क खरेदीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

मास्क कोणता वापरावा? 
मास्कचा वापर केल्याने संसर्ग किती टाळता येतो याविषयी तज्ज्ञ साशंक असले तरी, सध्या लोक दोन प्रकारचे मास्क वापरत आहेत. यामध्ये पहिला मास्क सर्जिकल मास्क आहे. हा मास्क डॉक्‍टर आणि परिचारिका रुग्णालयात वापरतात. हा मास्क अतिशय पातळ आहे आणि वापरायलासुद्धा सोपा आहे आणि किमतीनेसुद्धा कमी आहे. परंतु, हा मास्क तुम्हाला जास्त संरक्षण देणार नाही.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच ! 

त्याचा वापरही आठ तासाच्या वर करू नये असा नियम आहे. दुसऱ्या प्रकारचा मास्क म्हणजे एन 95 मास्क. या मास्कला पुढे एक फिल्टर असतो. जेणेकरून तुम्ही श्वास घेताना सगळ्या गोष्टी गाळल्या जाऊ शकतात. या मास्कमुळे तुमचे नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होते. शिवाय यातून श्‍वास घेणेही सोपे जाते. 

कापडी मास्क स्वच्छ धुवावे 
ज्या व्यक्ती महागडे एन-95 मास्क खरेदी करून शकत नाही अथवा ज्यांच्याकडे नाही त्यांनी काळजी न करता साधे कापडी मास्क वापरले, तरी काही प्रमाणात सुरक्षा मिळेल. ते दिवसांतून 2-3 वेळा बदलावेत आणि प्रत्येक वेळेस स्वच्छ धुतलेला वेगळा मास्क वापरावा. हे मास्क धुवायला टाकताना जंतुनाशक औषधात किमान 20 मिनिटे ठेवून मग धुवावेत. 

नागरिकांकडून मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मेडिकल स्टोअर्सवर सध्या सर्जिकल मास्क, एन 95 मास्क यासह बचतगटाने तयार केलेले कापडी मास्कही आता आम्ही विक्रीसाठी ठेवले आहेत. 
-सुनील चोरडिया, केमिस्ट, नागपूर.