बापरे...कोरोनाबळींमध्ये ४८ टक्के ज्येष्ठ नागरिक

due to corona, senior citizens in danger zone
due to corona, senior citizens in danger zone

नागपूर : शहरात आतापर्यंत झालेल्या एकूण कोरोनाबाधितांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची टक्केवारी ५० टक्के असल्याचे आढळून आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सावध होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे १ ते ६ ऑगस्ट या सहा दिवसांत शहरात ८७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. संपूर्ण जुलैमध्ये ७० कोरोनाबळींची नोंद झाली होती. सहा दिवसांतील बळीसंख्येने जुलै महिन्यातील मृत्यूसंख्येला मागे टाकल्याने शहरात कोरोनाने थैमान घातल्याचे दिसून येत आहे. 

महापालिकेने ६ ऑगस्टपर्यंत कोरोनाबळीची एकूण आकडेवारी जाहीर केली. शहरात मार्चमध्ये केवळ १६ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. जूनपर्यंत ७५० कोरोनाबाधित तर १४ मृत्यू झाले होते. परंतु जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधितच नव्हे तर मृत्यूसंख्येनेही शहरवासींची झोप उडविली.

जुलैमध्ये २४०१ बाधितांची नोंद झाली तर ७० जणांचा मृत्यू झाला. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात १ ते ६ तारखेदरम्यान ८७ जणांचा कोरोनाने बळी घेतला. मार्च ते ६ ऑगस्टपर्यंत शहरात १७० जणांचा मृत्यू झाला असून महापालिकेने वयानुसार मृत्यूची आकडेवारी जाहीर केली. यात ६१ वर्षांवरील ४८ टक्के नागरिकांचा समावेश आहे.

६१ वर्षांवरील ८२ मृत्यूमध्ये ५१ मृत्यू पुरुषांचे असून ३१ मृत्यू महिलांचे आहेत. त्यामुळे कोरोनचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असून त्यांना सावध राहण्याची तसेच घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू लॉकडाऊननंतर
मार्चपासून लॉकडाऊन लागू झाला. ३ जूनपर्यंत लॉकडाऊनच्या काळात झालेल्या मृत्यूमध्ये नोकरीतून निवृत्त झालेल्यांपैकी एकाचाही समावेश नव्हता. परंतु लॉकडाऊन उघडल्यानंतर ६० निवृत्तांचा मृत्यू झाला. निवृत्त घरात होते, तोपर्यंत सुरक्षित होते, असे महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. एकूण मृत्यूमध्ये ५१ कोरोनाबळी गृहिणी आहेत. १६ बेरोजगार तर १४ व्यावसायिकांचा समावेश आहे. खाजगी क्षेत्रात नोकरी करणारे १५ तर सरकारी नोकरीतील दोघांचा मृत्यू झाला.
 .
एक लाखामागे सर्वाधिक मृत्यू गांधीबाग झोनमध्ये
महापालिकेने मृत्यूची झोननिहाय आकडेवारी जाहीर केली असून एक लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक १६ मृत्यू गांधीबाग झोनमध्ये नोंदविण्यात आले. या झोनची लोकसंख्या २ लाख ४ हजार असून येथे एकूण सर्वाधिक ३२ मृत्यू झाले. त्यानंतर एक लाख लोकसंख्येमागे ११ मृत्यूची नोंद सतरंजीपुरा झोनमध्ये झाली. येथे एकूण २० कोरोनाबळींची नोंद झाली असून आशीनगर झोनमध्ये एकूण कोरोनाबळी २४ आहेत. मात्र एक लाख लोकसंख्येमागे ८ मृत्यूची नोंद करण्यात आली. येथील लोकसंख्या ३ लाख १७ हजार आहे.
 
वयानुसार कोरोनाबळींची संख्या
वयोगट   कोरोनाबळी    पुरुष      महिला
० ते २०      १                 १           ०
२१ ते ४०    १८               १२          ६
४१ ते ५०    ३३               २३         १०
५१ ते ६०     ३६               २५         ११
६१ ते ७०     ४३              २६          १७
७१ ते ८०      ३१              २०         ११
८१ व त्यावरील ८            ५            ३
(ही आकडेवारी ६ ऑगस्टपर्यंतची आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com