गरिबांची टॅंकरमागे धावाधाव बंद, झोपडपट्ट्यांची वाटचाल टॅंकरमुक्तीकडे

राजेश प्रायकर
Monday, 26 October 2020

झोपडपट्टीतील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी सार्वजनिक नळावर अवलंबून राहावे लागत होते. यासाठी अनेकदा दूरवर पायपीट करावी लागत होती.

नागपूर  ः शहरातील झोपडपट्ट्यांमधील प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोडणी देण्यात आल्याने गरिबांची टॅंकरच्या मागे धावाधाव बंद झाली. शहरातील अनेक झोपडपट्ट्या टॅंकरमुक्त झाल्या असून, काहींची टॅंकरमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. झोपडपट्टीतील प्रत्येक घराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी स्पष्ट केले.

झोपडपट्टीतील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी सार्वजनिक नळावर अवलंबून राहावे लागत होते. यासाठी अनेकदा दूरवर पायपीट करावी लागत होती. अनेकदा पाण्यासाठी टँकरच्या मागे धावावे लागत होते. झोपडपट्टीतील बहुतांश घरांमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी किमान एका सदस्याला रोजगारास मुकावे लागत होते. 

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

सार्वजनिक नळांभोवती तयार झालेले गटारामुळे नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबतही खात्री नव्हती. या स्थितीत २४ बाय ७ योजना सुरू करण्यात आली. परिणामी अनेक झोपडपट्‍ट्‍यांमधील घरांत आता स्वतंत्र नळ देण्यात आले.

देयके भरणेही सहज शक्य 

महापालिका-ओसीडब्लूच्या या प्रकल्पामुळे गरीब वस्त्यांतील नागरिकांना पाण्याची चिंता नसून प्रत्येकालाच रोजगारासाठी बाहेर निघणे शक्य झाले. नियमित पाणीपुरवठ्यामुळे घरातील प्रत्येकाला कामासाठी बाहेर पडणे शक्य झाल्याचे रामबाग वस्तीतील प्रकाश नागदेवे यांनी नमूद केले. मुलांनाही आता शाळा बुडविण्याची गरज राहिली नसल्याचेही नागमोते म्हणाले. गरिबांना पाणी दरात सवलत दिल्याने देयके भरणेही सहज शक्य झाल्याचे ते म्हणाले. 

 

प्रत्येक घराला नियमित पाणी
२४ बाय ७ प्रकल्पाची बांधणी झोपडपट्टीवासीयांचा विचार करून करण्यात आली होती.  झोपडपट्टीतील प्रत्येक घराला नियमित पाणीपुरवठा करण्यास आम्ही बांधील आहोत. यातून त्यांच्या आयुष्यांवर सकारात्मक प्रभाव पडला.  
 पिंटू झलके, जलप्रदाय समिती सभापती  

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Each house in the slum area will have a separate water connection