नागपुरात बिअरच्या बाटल्यांनाही फुटले पाय!, आधी कारवाई, नंतर दडवण्याची घाई

bottle
bottle

नागपूर : शहरातील एका नामांकित वाइन शॉपमधून दुसऱ्या बारमध्ये बिअरच्या चारशे पेट्या नियमबाह्य पद्धतीने हलविल्या जात असताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड घालून कारवाई केली खरी, मात्र वरिष्ठांचे निरोप येताच ही कारवाई दडपण्यात आल्याची खमंग चर्चा आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यास विचारणा केली असता त्यांनी ती नियमित तपासणी असल्याचे सांगितले.

लॉकडाउनच्या दिवशीपर्यंत असलेल्या साठ्याचीच विक्री करण्याची परवानगी बिअरबारला देण्यात आली आहे. बऱ्याच बारमालकांनी छुप्या पद्धतीने बंदच्या काळात अवैध पद्धतीने मद्याची विक्री केल्याची चर्चा आहे. यादरम्यान अनेक बार व दारूची दुकाने फोडण्याचे प्रकार घडले. ही फोडाफोडी दुकानदारांच्याच संगनमताने झाल्याचेही बोलले जाते. लॉकडाउन झाल्याच्या दिवशी असलेला साठा भरून काढण्यासाठी वाइन शॉपमधून तो भरला जात असावा, असा कयास आहे.

वाचा- जुन्या खेळांच्या केवळ आठवणीच शिल्लक; मुले टिव्ही, मोबाईलमध्ये व्यस्त 
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य नागपुरात एक वाइन शॉप आहे. या शॉपच्या फीडर गोदामातून बिअरच्या पेट्या दुसऱ्या एका बिअर बारमध्ये वळत्या करण्यात आल्या. 300 ते 400 पेट्या स्थलांतरित झाल्याची माहिती आहे. वाइन शॉपमधून बिअर बारमध्ये अशा प्रकारे बिअरच्या पेट्यांची इतरत्र वाहतूक करताना जिल्हाधिकारी किंवा उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, अधीक्षक किंवा निरीक्षकाची परवानगी आवश्‍यक असते. परंतु, हा माल हलविताना कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याची परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. सूत्रांच्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क कार्यालयाकडे याबाबतची तक्रार गेली. तक्रारीच्या आधारे त्यांच्या पथकाने वाईन शॉपवर धाड घालून कारवाई केली. कारवाई सुरू असतानाच पथकाला थेट वरिष्ठांकडून फोन आला. कारवाई थांबविण्याकरिता दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील यंत्रणा कामाला लागली. यात एका माजी मंत्र्यानेदेखील खटपट केल्याचे ऐकिवात आहे. वरिष्ठांकडूनच असे प्रतिबंध घातले जात असतील तर दारूच्या अवैध विक्री, वाहतुकीवर आळा बसणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.

वाइन शॉपीची नियमित तपासणी सुरू आहे. नोंदणीनुसार स्टॉक आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्यात येत आहे. सक्षम यंत्रणेची परवानगी घेतली असल्यास त्याला अवैध म्हणता येणार नाही. चौकशी सुरू आहे.
-मोहन वर्दे, उपायुक्त, उत्पादन शुल्क विभाग, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com