अरे हे काय... अकरावीचे वर्ग शहरात बंद, ग्रामीण भागात सुरू

मंगेश गोमासे
Friday, 2 October 2020

कोरोनामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. पहिल्या यादीचे प्रवेशपुर्ण झाले असले तरी, दुसरी गुणवत्ता यादीचे प्रवेश सुरू असतानाच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे संपूर्ण प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणामुळे अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रखडली असताना ग्रामीण भागात अकरावीचे वर्ग सुरू झाल्याची माहिती आहे. शहरात मात्र, अजून वर्ग सुरू झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. प्रवेश प्रक्रिया किती दिवस लांबेल हे सांगता येत नसल्याने शहरी भागातील महाविद्यालयात रिक्त जागांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. पहिल्या यादीचे प्रवेशपुर्ण झाले असले तरी, दुसरी गुणवत्ता यादीचे प्रवेश सुरू असतानाच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे संपूर्ण प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. केवळ नागपूरच नव्हे तर मुंबई, पुणे येथे आक्टोंबर उजाडला तरी प्रवेश पूर्ण करता आले नाही. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिक्षण संचालकांनी प्रवेश प्रक्रिया थांबविली. अद्याप यावर निर्णय झालेला नाही. या सर्व गोंधळात विद्यार्थी वर्ग मात्र कमालीचा हैराण झाला आहे. या ना त्या कारणाने सातत्याने शिक्षणात येत असलेले अडथळे पालकांची चिंता वाढविणारे आहे. 

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर
 

दुसरीकडे ग्रामीण भागात प्रवेश प्रक्रिया आटोपली असून, ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र, शहरात प्रवेश प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? आणि अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? हा प्रश्न आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यास पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कशी करणार ? अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत आहेत.

अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा
ग्रामीण भागात अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. अभ्यासक्रम शिकवले जात आहे. पण शहरातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे काय ? पुढे अकरावीचे वर्ग उशिराने सुरू झाल्यास किती अभ्यासक्रम शिकवायचा त्याचा आराखडा शिक्षकांच्या हाती नाही. त्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा आणि किती असे प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.
- दिलीप तडस
उपप्राचार्य, विदर्भ बुनियादी कनिष्ठ महाविद्यालय. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh classes start in rural areas, closed in cities