हॉकीचा 'गुरू' काळाच्या पडद्याआड

नरेंद्र चोरे
Monday, 23 November 2020

विदर्भाचे माजी राष्ट्रीय हॉकीपटू, रेल्वेचे माजी कर्णधार, माजी आंतरराष्ट्रीय हॉकी पंच, क्रीडा संघटक, तांत्रिक अधिकारी आणि विदर्भ हॉकी संघटनेचे (व्हीएचए) माजी सचिव व आजीवन सदस्य अशा विविध भूमिका यशस्वीरित्या पार पडणारे गुरुमुर्ती यांनी हॉकीवर मनापासून प्रेम केले.

नागपूर  : अमरावती मार्गावरील व्हीएचए मैदानावर हॉकीचा सामना असेल आणि तिथे गुरुमुर्ती पिल्ले उपस्थित नसतील, असे क्वचितच पाहायला मिळाले. हॉकी आणि गुरुमुर्ती यांचे अतूट नाते नागपूरकरांनी अनेकवेळा पाहिले आणि अनुभवले आहे. हॉकीसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे ८३ वर्षीय गुरुमुर्ती पिल्ले यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने व्हीएचएने लोकप्रिय अष्टपैलू व्यक्तीमत्व तर गमावलेच, शिवाय युवा खेळाडूंचा सच्चा गुरू व मार्गदर्शकही हिरावून नेला.

विदर्भाचे माजी राष्ट्रीय हॉकीपटू, रेल्वेचे माजी कर्णधार, माजी आंतरराष्ट्रीय हॉकी पंच, क्रीडा संघटक, तांत्रिक अधिकारी आणि विदर्भ हॉकी संघटनेचे (व्हीएचए) माजी सचिव व आजीवन सदस्य अशा विविध भूमिका यशस्वीरित्या पार पडणारे गुरुमुर्ती यांनी हॉकीवर मनापासून प्रेम केले. वयाच्या नव्वदीतही त्यांच्यात तितकाच उत्साह व जोश होता.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का
 

उमेदीच्या काळात दर्जेदार राष्ट्रीय हॉकीपटू राहिलेले गुरुमुर्ती यांनी १९६४ ते ७२ या काळात विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय पंच म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला. लंडनमध्ये झालेल्या चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत पंच म्हणून बजावलेली भूमिका त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर भारतीय रेल्वे आणि पाकिस्तान रेल्वे यांच्यात झालेल्या सामन्यातही पंचगिरी करण्याचा त्यांना बहुमान मिळाला होता. 

याशिवाय आगा खान चषक, मुंबई सुवर्णचषक व राष्ट्रीय हॉकी स्पर्धांसह अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. पिल्ले यांनी खेळाडू व कर्णधार म्हणून रेल्वे संघाकडूनही शानदार कामगिरी बजावली. आझाद चौक, सदर येथे राहणारे पिल्ले यांच्या पार्थिवावर सायंकाळी मानकापूर घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी व्हीएचएच्या पदाधिकाऱ्यांसह क्रीडा जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex international umpire Gurumurthy Pillai passes away