तज्ज्ञ सांगतात, कोरोनानंतर हलक्या व्यायामासह आहारात घ्यावी काळजी

राजेश प्रायकर
Monday, 28 September 2020

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात सोमवारी डॉ. केविन अग्रवाल आणि डॉ. उत्कर्ष शाह यांनी मार्गदर्शन केले. कोरोनाविरुद्ध लढताना रोगप्रतिकारशक्ती गरजेची आहे. यासाठी व्‍हिटॅमीन सी, डी आणि झिंक औषधे दिली जातात. मात्र ही औषधे आपण जास्त वेळ खाऊ शकत नाही.

नागपूर : आता कोरोनासोबतच जगायचे असल्याने रोजच्या आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, द्राक्षे या फळांचे सेवन करा. कोरोना झाल्यानंतर अशक्तपणा येतो. तो दूर करण्यासाठी खुर्चीवर बसणे, उभे राहणे, घरातच चालणे असा सोपा व्यायाम करावा. कठीण व्यायाम टाळावा, असा सल्ला फिजिओथेरेपीस्ट डॉ. केविन अग्रवाल आणि कन्सल्टन्ट इंटेन्सिव्हिस्ट डॉ. उत्कर्ष शाह यांनी दिला. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी नियमित व्यायामावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात सोमवारी डॉ. केविन अग्रवाल आणि डॉ. उत्कर्ष शाह यांनी मार्गदर्शन केले. कोरोनाविरुद्ध लढताना रोगप्रतिकारशक्ती गरजेची आहे. यासाठी व्‍हिटॅमीन सी, डी आणि झिंक औषधे दिली जातात. मात्र ही औषधे आपण जास्त वेळ खाऊ शकत नाही. रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी लिंबु, आवळा, मोसंबी, द्राक्षे अशी लिंबुवर्गीय फळे घ्या. याशिवाय नियमित व्यायाम करा, असा सल्ला त्यांनी दिला. 

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

आज कोव्हिडनुसार जीवनशैली विकसित करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्वप्रथम प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याकरिता व्हिटॅमीन सी आणि डीकरिता लिंबुवर्गीय फळे खा, झिंककरिता सुकामेवा घ्या. लवकर झोपणे आणि लवकर उठण्यावर भर देण्याची सूचनाही त्यांनी केली. नैसर्गिक बाबींचा जीवनशैलीत अंगीकार करा. मास्क, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर जीवनावश्यक आहे. 

मधुमेह, उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. कोरोनानंतर अनेकांना अशक्तपणा येतो. यासाठी फिजिओथेरेपीची महत्वाची भूमिका आहे. कोव्हिड बाधित रुग्णांमध्ये अतिशय जास्त अशक्तपणा असल्याने त्यांनी कठीण व्यायाम करू नये. खुर्चीवर बसणे आणि उभे राहणे, घरातच चालणे असे सोपे व्यायाम करावे. प्रत्येक रुग्णाला फिजिओथेरेपीची गरज नाही. त्यामुळे यासबंधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. केविन अग्रवाल आणि डॉ. उत्कर्ष शाह म्हणाले. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: exercise regularly to relieve weakness after corona