सावधान! नागपुरात टोळ्या सक्रिय, दबाव टाकून करतात पैशांची मागणी 

money
money

नागपूर  : लॉकडाऊनमुळे नागपूरकर घरात बंदिस्त आहेत. त्याचवेळी वस्त्यांमध्ये फिरून पैशांची मागणी करणाऱ्या संधीसाधू टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. दबाव टाकून नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार नागरिक घरातच तळ ठोकून आहेत. अशा कठीण काळातही काही संधीसाधू टोळ्या उपराजधानीच्या वस्त्यावस्त्यातून फिरून  अनधिकृतपणे पैशांची वसुली करीत आहे. साधारणतः दुपारच्या वेळी घरातील मंडळी झोपलेली असतात. हीच संधी साधून टोळीचे सदस्य प्रामुख्याने महिला घरोघरी जातात.

चेहऱ्यावर केविलवाणे भाव आणत पैशांची अडचण असल्याचे सांगून मदतीची विनंती करतात. परंतु, कोणी पैसे देण्यास नकार दिल्यास त्या आक्रमक होतात. दुषणे देत घरातील महिलांना भीती दाखवली जाते. भीतीपोटी कुणी जेवण किंवा अन्य साहित्य देण्याची तयारी दाखवतात. परंतु अशा वस्तूंना नकार देत पैशांची मागणी या सदस्यांकडून केली जाते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून साधारणत: नंदनवन, गुरुदेवनगर, भांडे प्लॉट, धन्वंतरीनगर, रमणा मारोती अशा वस्त्यांमध्ये टोळीचे सदस्य फिरताना दिसत आहेत.

पोषाखावरून ही मंडळी परप्रांतीय असल्याचे प्रथमदर्शनीच लक्षात येते. पैशांचा अनाठायी आग्रह संशय निर्माण करणारा आहे. यामुळेच  नागरिक त्यांना परतवून लावत आहेत. पण, सर्वांसाठीच ही अडचणीची वेळ आहे. एकमेकांच्या साथीने मदतीनेच एकेक दिवस पुढे ढकलले जात आहे. गरजवंतांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत. पण वस्त्यांमध्ये फिरणाऱ्या संधीसाधू टोळ्यांमुळे मदतीमागील भावनेलाच तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास गरजूंना मदतीपासून वंचित राहावे लागू शकते.

या कठीण समयी प्रशासन आपली भूमिका चोख बजावत आहे. नागरिकांनाही सजग राहून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com