"शेतकरीच उतरवणार भाजप सरकारचा घमेंड"; राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे यांची टीका 

टीम ई सकाळ 
Saturday, 5 December 2020

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून ते कायदेच रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

नागपूर ः आम्हीं करू तीच पूर्व दिशा, ही भाजप सरकारची घमेंड उतरवून हम करे सो कायदा चालणार नाही, हे शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या लक्षात आणून दिले आहे. मोदी सरकारची जिरवताना त्यांना गुडगे टेकायला भाग पाडलं, हे चित्र आज स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने अतिरेक करू नये, आणि अत्याचारी कृषी विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील केली आहे.

शिवसेनेनं सामनामध्ये आजच्या अग्रलेखात मोदी सरकारच्या नीतीची चिरफाड करताना मोदी सरकारवर टिका केली ती वाजवीचं होती. मोदी सरकारने नोटाबंदी पचवून ढेकर दिला. जीएसटीने केलेला सत्यानाश पचवला. बेरोजगारी, महागाईवर हिंदू-मुसलमान भाडण, हिंदुस्थान- पाकिस्तानचा उपाय दिला. लॉक डाऊनने जेरीस आलेल्या जनतेला अयोध्येत राममंदिराचे तबक दिले. पण पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर त्यांचे कोणतेही ‘लॉलीपॉप’ चालले नाही. 

जाणून घ्या - Video : तारणहार म्हणवणाऱ्या जगदीश खरेंची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद; अभिनेता अक्षयकुमारने दिले होते पाच लाख

हे यश पंजाबच्या शेतकऱ्यांच्या एकीत दिसलं. भाजपच्या सायबर सेलने शेतकऱ्यांच्या एकजुटीत हर तऱ्हेनं फूट पाडण्याचे कारस्थान सुरू केले आहेच. हरियाना सीमेवर वृद्ध शेतकऱ्यांना पोलीस चोपत असल्याचे फोटो व्हायरल होताच भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना टार्गेट करत ते खोटारडे असल्याचा कांगावा केल्याचेही कुंटे पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून ते कायदेच रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

विज्ञान भवनात दीर्घकाळ चाललेली प्रथम बैठक निष्फळ ठरली. मोदी सरकारने पास केलेले तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मोदी सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले व कृषी कायदे कसे शेतकऱ्यांचे हित जपणारे आहेत यांचे गोडवे गात त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तसूभरही परिणाम शेतकऱ्यांवर झाला नाही व शेतकरी नेते सरकारचं चहा-पाणी घेताच बैठकीतून नाराज होऊन निघून गेले.

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

‘हिंदुस्थानातील सर्वात बदनाम विरोधी पक्षनेत्यांपैकी एक’ अशी राहुल गांधींची संभावना करताच ट्विटरने मालवीय यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली व शेतकऱ्यांना पोलीस मारत असल्याचा व्हिडीओच प्रसिद्ध केला. भाजपचा आयटी सेल त्यामुळे तोंडघशी पडला. दुसरे प्रकरण मुंबईस पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या भाजपच्या बेमुर्वत आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या नटीचं. शेतकरी आंदोलनात भाग घेणाऱ्या एका वृद्ध आजीला या मूर्ख नटीने शंभर रुपये रोजावर काम करणारी शाहीन बागवाली ठरवले. याबद्दल वृद्ध शेतकरी महिलेनं या नटीला चांगलंच बजावलं. कांगावा करणाऱ्या नटीचे हे प्रकरणसुद्धा खोटे ठरले व त्या बेताल नटीला माघार घ्यावी लागली, यावरून तरी केंद्र सरकारने धडा घ्यावा असं कुंटे म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will take down ego of central government said pravin kunte