सहा कोटी रुपये खर्चून नागपूर विद्यापीठात होणार सदोष ट्रॅक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

नागपूर विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी शिंडर ट्रॅकवर चारशे मीटर अंतराचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्याचा निर्णय घेतला. शारीरिक शिक्षण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये सिंथेटिक ट्रॅकचा पहिल्यांदा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील धावपटूंसह शहरातील अन्य धावपटूंना सराव करता यावा, या उद्देशाने विद्यापीठाच्या सध्याच्या शिंडर ट्रॅकवर लवकरच सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात येणार आहे. मात्र, हा शिंडर ट्रॅक तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याची चर्चा असल्याने त्यावर कोट्यवधींची उधळण करून सिंथेटिक बांधणे कितपत योग्य व फायदेशीर आहे, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

नागपूर विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी शिंडर ट्रॅकवर चारशे मीटर अंतराचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्याचा निर्णय घेतला. शारीरिक शिक्षण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये सिंथेटिक ट्रॅकचा पहिल्यांदा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला अलीकडेच मंजुरी मिळाली असून, टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत ट्रॅकच्या कामाला सुरवात होणार असल्याची माहिती आहे. मात्र, येथील शिंडर ट्रॅक पूर्व-पश्‍चिम असल्याने तांत्रिकदृष्ट्या, सदोष आहे. नियमानुसार कोणताही ट्रॅक हा उत्तर-दक्षिण असायला हवा.

- मटण महागले चिंता नको... मदतीला धावली अंडी

येथे उत्तर-दक्षिण ट्रॅक तयार करायचा झाल्यास, बाजूच्या वसतिगृहाचा काही भाग आणि दोन्ही बाजूंचे पॅव्हेलियनही तोडावे लागणार आहे. हे काम अधिक खर्चिक असून, त्याला वेळही खूप लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने आहे त्याच ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक बांधण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यासंदर्भात शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, नियमानुसार, कोणताही ट्रॅक उत्तर-दक्षिण आवश्‍यक असला तरी, येथे उत्तर-दक्षिण अशी पुरेशी जागा नसल्यामुळे ट्रॅक "ऍडजस्ट' करावे लागत आहे. त्यामुळे हा ट्रॅक सध्या आहे, त्याचपरिस्थितीत पूर्व-पश्‍चिम असाच होणार आहे. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून येथे कसल्याही अडथळाविना नियमितपणे स्पर्धा होताहेत. होस्टेल व पॅव्हेलियनची तोडफोड केल्यास सिंथेटिक ट्रॅक पुन्हा लांबणीवर पडू शकतो. विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक स्वबळावर बांधणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्‍यकता भासल्यास त्यात आणखी पैसे टाकण्याची विद्यापीठाची तयारी आहे.

असा असेल सिंथेटिक ट्रॅक
आठ लेनचा ट्रॅक राहणार असून आतील भागात लॉन कायम राहणार आहे. त्याचा उपयोग फुटबॉलसाठी होईल. शिवाय मैदानाच्या चारही बाजूंनी फ्लडलाइट्‌स असतील. हा ट्रॅक नागपुरातील धावपटूंसाठी सोयीचा राहणार असून, विद्यापीठासह इतरही युवा धावपटूंना याचा फायदा मिळणार आहे. ट्रॅक सदोष राहण्याची शक्‍यता असल्याने या ट्रॅकला ऍथलेटिक्‍स महासंघाची तांत्रिक मान्यता मिळेल का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ही मान्यता मिळाली नाही तर, येथे राज्य स्पर्धेच्या पलीकडील स्पर्धेचे आयोजन होणे कठीण आहे, असे जाणकारांचे मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: faulty athletics track in nagpur university