बंडखोरांना बसविण्यासाठी नेत्यांची फिल्डिंग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

तब्बल साडेसात वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी मागील दोन वर्षांत चांगलीच फिल्डिंग लावून मतदारसंघ बांधून ठेवले होते. उमेदवारी मिळणार या आशेवर प्रचारही सुरू केला होता.

नागपूर :  उमदेवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवल्याने नाराज झालेल्या आणि बंडाचे निशाण फडकवलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंडखोरांच्या दावेदारीने अनेकांचे विजयाचे समीकरण बिघडण्याची शक्‍यता असल्याने त्यांचे बंड शांत करण्यासाठी अनेक बड्या नेत्यांना मध्यस्थी करावी लागत आहे. 27 तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज परत घेता येणार आहेत. 

तब्बल साडेसात वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी मागील दोन वर्षांत चांगलीच फिल्डिंग लावून मतदारसंघ बांधून ठेवले होते. उमेदवारी मिळणार या आशेवर प्रचारही सुरू केला होता. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक मोठे उलटफेर पाहावयास मिळाले. "पार्टी विद डिफरन्स' असलेल्या भाजपमध्ये बंडखोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. भाजपने वेळेवर नावे जाहीर केल्याने पक्षाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

ऐन वेळेवर उमेदवारी

खडकी मतदारसंघात वंदना पाल यांचे नाव मागे पडले होते. दरम्यान, प्रिया नरेंद्र वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे वंदना पाल घरी निघून गेल्या. अखेरच्या क्षणी त्यांना बोलावून पक्षाचा अर्ज दिला. यात उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे दोन इच्छुक चांगलेच नाराज झाले आहेत. करंभाड सर्कलमध्ये भाजपकडून प्रभा कडू यांना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. यामुळे सरोज तांदूळकर यांचे नाव मागे पडले. मात्र, ऐन वेळेवर सरोज तांदूळकर यांना उमेदवारी देण्यात आली. 

हेही वाचा : तिकीट कापले ना... आता बंडखोरी होणारच 

उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेत प्रवेश

अरोली जिल्हा परिषद सर्कलमधून माजी जि. प. सदस्य सदानंद निमकर व अशोक हटवार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. येथून हटवार यांना उमेदवारी दिली आहे. तर निमकर अपक्ष उभे आहेत. गोंडेगाव सर्कलमधून योगेश वाडीभस्मे यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत अर्ज दाखल केला. याशिवाय भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. 

कॉंग्रेसमध्ये बंडखोरीचे प्रमाण कमी

माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनीही बंडखोरी करीत मेटपांजरा सर्कलमधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. येथून आमदारपुत्र सलील देशमुख व राष्ट्रवादीच्याच डॉ. वैशाली जयंत टालाटुले यांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही बंडखोरी झाली असून अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. कॉंग्रेसमध्ये तुलनेत बंडखोरीचे प्रमाण कमी दिसत असले तरीदेखील नंदा नारनवरे यांना उमेदवारी मिळाली नाही. माहुली सर्कलमधून हर्षवर्धन निकोसे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. करंभाड सर्कलमधून सुषमा शहाणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. 

नेत्यांसमोर आव्हान

अपक्ष अर्ज दाखल करून पक्षाने दिलेला उमेदवाराचा विजय सुकर करण्यासाठी बंड शांत करण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसमोर आहे. या बंडखोरांची समजूत काढून त्यांचे पुनर्वसन कसे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fielding of leaders to set up the rebels